आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘झू पार्क’साठी हालचाली गतिमान!

0

महापालिका आयुक्तांनी केली नगरसेवक व अन्य अधिकार्‍यांसमेवत पाहणी

पिंपरी-चिंचवड : महापालिका प्रशासनाच्या वतीने शहरातील प्रभाग क्रमांक 12 (तळवडे, रुपीनगर) येथील गावठाणात असलेल्या गायरानाच्या जमिनीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘झू पार्क’ साकारले जाणार आहे. झू पार्क उभारण्याच्या हालचालींना आता चांगलीच गती आली आहे. लवकरच त्याचे काम सुरू होणार असून, पुढील वर्ष ते दीड वर्षात हे काम कसे पूर्ण करता येईल, या दृष्टीने नियोजन आखले जात आहे. शनिवारी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी या नियोजित झू पार्कच्या जागेची पाहणी केली. तळेगाव गावठाणात गायरानाची सुमारे 100 एकर जमीन असून, त्यापैकी 58 ते 60 एकर जमिनीवर हे झू पार्क उभारण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. त्यामुळे आवश्यक तेवढ्या जमिनीचे त्वरित मोजमाप करून पुढील कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करावी, अशा सूचना आयुक्तांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना केल्या. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या झू पार्कमुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या वैभवात भर पडणार असून, शहरवासीयांसाठी ते वेगळे आकर्षण ठरेल. त्यामुळे शक्य तितक्या लवकर या झू पार्कचे काम पूर्ण करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

यांची होती उपस्थिती
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक प्रवीण भालेकर, पंकज भालेकर, पौर्णिमा सोनवणे, संगीता ताम्हाणे, मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके, उद्यान (स्थापत्य) विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कांबळे, उपअभियंता जाधव, नगररचना विभागाचे उपअभियंता माने यांच्यासह प्रभागातील नागरिकांची याप्रसंगी उपस्थिती होती.

नागरिकांच्या सूचना व हरकती मागविल्या
महापालिका प्रशासनाने तळवडे गावठाणाच्या गायरान जमिनीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे झू पार्क उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हे झू पार्क कसे असावे, त्याची रचना, झू पार्कमध्ये कोणत्या बाबी असाव्यात, यासंदर्भात महापालिका प्रशासनाने शहरातील नागरिकांकडून सूचना व हरकती मागविल्या आहेत. त्यासाठी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर एक लिंक देण्यात आली असून, त्या लिंकच्या माध्यमातून नागरिकांना झू पार्कसंदर्भात आपल्या सूचना व हरकती नोंदविता येणार आहेत. नागरिकांकडून प्राप्त झालेल्या सूचना व हरकतींचा निश्‍चित विचार केला जाणार आहे. त्यानंतर झू पार्कच्या पुढील कामाचे टप्प्याटप्प्याने नियोजन होणार आहे, अशी माहिती उद्यान (स्थापत्य) विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कांबळे यांनी ‘जनशक्ति’शी बोलताना दिली.

जमिनीच्या मोजणीनंतर ‘डीपीआर’चे काम
झू पार्कच्या मोजणीनंतर ‘डीपीआर’चे काम सुरू करण्यात येणार आहे. झू पार्कच्या जागेसाठी महापालिका आयुक्तांचा जिल्हाधिकार्‍यांकडे पाठपुरावा सुरू आहे. शनिवारी जागेची पाहणी करताना आयुक्तांनी लेआऊट व इतर बाबींची माहिती जाणून घेतली. आता पुढे डीपीआरचे काम करण्यात येईल. या कामासाठी महापालिका प्रशासनाने आर्किटेक्टची नेमणूकदेखील केली आहे. दिल्ली येथील पंकज जैन हे आर्किटेक्ट म्हणून काम पाहत आहेत. झू पार्कसाठी नियोजित असलेली जागा निश्‍चित झाल्याने आता पुढील कार्यवाहीला वेग आला आहे.

पर्यटनाला चालना मिळणार
पिंपरी-चिंचवड शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे झू पार्क होणार असल्याने शहराच्या लौकिकात भर पडणार आहे. भविष्यात पर्यटनालाही चालना मिळू शकणार आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात नामांकित शिक्षणसंस्था आहेत. त्यामुळे देशासह जगभरातून विद्यार्थी शहरात शिक्षणासाठी येत असतात. दुसरीकडे लोणावळा, खंडाळा, ही पर्यटनस्थळे परदेशी पर्यटकांना आकर्षित करत असतात. आंतरराष्ट्रीय दर्जाचे झू पार्क झाल्यानंतर याठिकाणीही परदेशी नागरिक, विद्यार्थी भेट देतील, यात शंका नाही. त्यामुळे पर्यटन वाढीस हातभार लागणार आहे.

तळवडे गावठाणातील गायरान जमिनीवर सुमारे 58 एकरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे झू पार्क उभारले जात आहे. विशेष म्हणजे, आमच्या प्रभागात हा प्रकल्प साकारला जात असल्याने आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. शनिवारी आयुक्तांनी अन्य अधिकार्‍यांसोबत झू पार्कच्या जागेची पाहणी केली. आयुक्तांचा जिल्हाधिकार्‍यांकडे पाठपुरावा सुरू आहे. लवकरच डीपीआरचे कामदेखील सुरू होईल. आयुक्तांना जागा आवडली असून, पुढील कार्यवाही लवकर पूर्ण करण्यावर आमचा भर आहे. प्रभागातील नागरिकांसाठी प्रशस्त उद्यान, क्रीडांगण व जलतरण तलावदेखील उभारला पाहिजे, अशी आमची मागणी आहे.
-पंकज भालेकर, स्थानिक नगरसेवक

महापालिका प्रशासनाच्या वतीने तळवडेतील गावठाणातील गायरान जमिनीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे झू पार्क साकारण्याचे नियोजन आहे. आता हा प्रकल्प उभारण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. शनिवारी आयुक्तांनी प्रभागातील चारही नगरसेवक व अन्य अधिकार्‍यांसोबत पाहणी केली. जागेची लवकरात लवकर मोजणी करण्याच्या सूचना यावेळी आयुक्तांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना केल्या. हा देशातील सर्वात मोठा व पहिलाच प्रकल्प असणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरासाठीदेखील हे वेगळे आकर्षण ठरणार आहे. झू पार्कमुळे पर्यटनाला चालना मिळेल. तसेच शहराचेही नाव होईल.
-प्रवीण भालेकर, स्थानिक नगरसेवक

तळवडे गावठाणातील गायरानाच्या सुमारे 58 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे झू पार्क उभारण्याचे महापालिका प्रशासनाने नियोजन आहे. त्यासाठीच शनिवारी आयुक्तांनी जागेची पाहणी केली. लवकरच जागेचे मोजमाप करण्यात येणार असून, त्यानंतर डीपीआरचे काम सुरू केले जाणार आहे. झू पार्कसंदर्भात महापालिका प्रशासनाने शहरातील नागरिकांकडून सूचना व हरकती मागविल्या आहेत. त्यासाठी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर एक लिंक देण्यात आली असून, त्या लिंकच्या माध्यमातून नागरिकांना झू पार्कसंदर्भात आपल्या सूचना व हरकती नोंदविता येतील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने काम पुढे होईल.
-संजय कांबळे, कार्यकारी अभियंता, उद्यान (स्थापत्य) विभाग