नवी दिल्ली । हेरगिरीच्या आरोपावरुन भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील युक्तिवाद पूर्ण झाला असून, यावरील निकाल गुरुवारी, भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुनावण्यात येणार आहे.
पाकिस्तानच्या न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपावरुन फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, भारताने या निर्णयाला आव्हान देत आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. त्यानंतर न्यायालयाने जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा हा निर्णय पाकिस्तानला अमान्य होता. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांची बाजू ऐकून घेण्यात आली असून, युक्तिवाद पूर्ण झाला आहे. दरम्यान, याबाबतचा निर्णय गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास होणार असल्याचे सांगितले जात आहे.
सोमवारी झालेल्या सुनावणीत ज्या व्हिडिओच्या आधारावर पाकिस्तान आपली बाजू मांडणार होते, तो कुलभूषण जाधव यांच्या कथित कबुलीनाम्याचा व्हिडिओ न्यायालयात दाखवण्यास परवानगी नाकारात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानाला मोठा दणका दिला होता. रॉ चे एजंट असल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानमध्ये अटक झालेल्या भारताच्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमधील रावळपिंडी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्याविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने यापूर्वीच कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती दिली आहे. भारताच्या वतीने जेष्ठ विधिज्ञ हरिष साळवे यांनी भारताची बाजू भक्कमपणे न्यायालयासमोर मांडली. पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचा भंग केला आहे, असा दावा भारताच्या वतीने करण्यात आला. 15 एप्रिलला दुपारी दीड वाजता सुनावणीला सुरुवात झाली. या सुनावणीचे थेट प्रक्षेपण संयुक्त राष्ट्रसंघाच्या आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या वेबसाईटवर करण्यात आले होते. हेरगिरी करत असल्याचा आरोप करत पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली. भारताने 8 मे रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका दाखल करुन दाद मागितली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती दिली.