जनशक्तीचे निवासी संपादक डॉ युवराज परदेशी यांचा विशेष लेख
देशभरात कोरोनाच्या दुसर्या लाटेने थैमान घातले असून अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजन, रेमडीसिव्हीरसह व्हेंटिलेटर्स व औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. या संकटकाळात अनेक देशांनी भारतापुढे मदतीचा हात पुढे केला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, सौदी अरेबिया यासारख्या अनेक देशांनी वैद्यकीय साहित्य, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, बेड्स, इंजेक्शन्स, औषधनिर्मितीसाठी आवश्यक कच्चा माल पुरविण्याची तयारी दर्शवली आहे. सौदी अरेबिया, सिंगापूरने ऑक्सिजनचा पुरवठा सुरु देखील केला आहे. रशिया, फ्रान्स, युरोप, चीन, पाकिस्तान या देशांनीही भारताला मदत करण्याचे धोरण जाहीर केले आहे. मागील अनेक आठवड्यांपासून भारतामधील लस निर्मितीसाठी आवश्यक असणार्या कच्च्या मालाचा पुरवठा करण्यासाठी अडवणूक करणार्या अमेरिकेनेही भारताला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. भारताचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील दबदबा आणि अन्य देशांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन यामुळे पुन्हा एकदा अधोरेखीत झाला आहे.
भारतात गत आठवड्यापासून दैनंदिन रुग्णवाढ ही तीन लाखांहून अधिक झाल्याने हा जगभरात चिंतेचा विषय झाला आहे. यावरुन काही आंतरराष्ट्रीय पातळीवरील माध्यमांनी भारताविरोधात गरळ ओकणे सुरु केले आहे. यावरुन देशात राजकारण झाले नसते तर नवलच ! कोरोनावरुन कुणीही राजकारण करु नये, असे सर्वच पक्षातील नेते बोलत असले तरी परिस्थिती वेगळीच आहे. कोरोनाच्या मुद्यावरुन सुरु असलेली राजकीय चिखलफेक थांबायचे नाव घेत नाही. वॅक्सीन मैत्री अंतर्गत भारताने आतापर्यंत जगातील सुमारे 71 देशांना कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या 5 कोटी 86 लाख मात्रा पोहोचवल्या आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, भूतान, मालदीव, मॉरिशस, श्रीलंका, सेशल्स, बहरीन, ओमान आणि अफगाणिस्तान या देशांना लस पुरवण्यात आली. तर व्यावसायिक तत्वावर 24 देशांना 3 कोटी 39 लाख लसीच्या मात्रा पुरवल्या आहेत. यावरुनही मोठा गदारोळ सुरु आहे. भारतात लसींचा तुटवडा असतांना अन्य देशांना लसी का दिल्या? अशी टीका विरोधी पक्षांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर करण्यात येत आहे. मात्र कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान भारताने अन्य देशांना दिलेल्या मदतीची परतफेड आता कोरोनाच्या दुसर्या लाटेदरम्यान अनेक देशांनी करायला सुरुवात केली आहे. सौदी अरेबियाने 80 मेट्रिक टन प्राणवायू भारताला पाठवला आहे. सिंगापूरने चार क्रायोजेनिक प्राणवायू टाक्या पाठवल्या असून संयुक्त अरब अमिरातीही भारतीय दूतावासाच्या मदतीने प्राणवायूच्या टाक्या पाठवण्याच्या विचारात आहे. युरोपीय समुदाय व रशिया यांनी प्राणवायू संबंधित व इतर औषधांची मदत भारताला देण्याचे ठरवले आहे. रशियाने वैद्यकीय मदतीचा प्रस्ताव ठेवला आहे. रेमेडेसिव्हीर, ऑक्सिजनची मदत करण्याचा प्रस्ताव रशियाने दिला आहे. आगामी 15 दिवसांमध्ये रशियाकडून आयातही सुरू होणार आहे. रशियाने सांगितले की, दर आठवड्याला तीन ते चार लाख रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा होऊ शकतो. आवश्यकता भासल्यास ही संख्या अधिक वाढवता येऊ शकते. इस्रायलनेदेखील करोनाच्या संकटाशी सामना करणार्याला भारताबद्दल संवेदना व्यक्त केली आहे. आम्ही करोनाविरोधातील लढाईत आमचा चांगला मित्र भारतासोबत आहोत. लवकरच हे संकट दूर होणार असल्याचे इस्रायलच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर नमूद करण्यात आले आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी, या लढ्यामध्ये फ्रान्स तुमच्यासोबत आहे. असे ट्विट केले आहे. तर युरोपियन परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मायकेल यांनी, युरोपियन संघ भारतासोबत या लढयामध्ये उभा असून 8 मे रोजी होणार्या भारत-युरोप परिषदेत आम्ही चर्चा करू, असे म्हटले आहे. भारताला मदत करणार्या देशांमध्ये गेल्या अनेक दशकांपासून शत्रुत्व निभावणार्या चीन आणि पाकिस्तानचादेखील समावेश आहे. पहिल्या लाटेदरम्यान अमेरिकेला हायड्रॉक्सिक्लोरोक्विन औषधी पुरविणार्या भारताला दुसर्या लाटेदरम्यान मदत न करण्याची आडमुठी भुमिका अमेरिकेने ‘अमेरिका फर्स्ट’ या धोरणामुळे घेतली होती. मात्र, यास अमेरिकन खासदारांनीच विरोध करत भारताच्या मदतीसाठी बायडन प्रशासनाला आवाहन केलेे. दरम्यान भारताचे एनएसए अजित डोवाल आणि अमेरिकेचे एनएसए जेक सुलिवन यांच्याशी चर्चा केल्यानंतर कोरोना लस बनवण्यासाठी कच्च्या मालाच्या निर्यातीवरील बंदीची भूमिका अमेरिकेने मागे घेतली आहे. कोरोना संकटात ज्याप्रकारे भारताने मदत केली, तशीच मदत करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे आश्वासन अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी दिले आहे. यामुळे अमेरिकेतही भारताची लॉबिंग यशस्वी ठरली असल्याचे स्पष्ट झाले आहे. याव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय पातळीवरील दोन बलाढ्या कंपन्याही मदतीसाठी पुढे सरसावल्या आहेत. कोरोनाच्या दुसर्या लाटेची चिंता व्यक्त करत गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी भारतासाठी 135 कोटींच्या मदत देऊ केली आहे. मायक्रोसॉप्टचे मुख्य कार्यकारी सत्या नाडेल यांनीही भारताला आर्थिक मदत दिली आहे. सर्वात कौतुकास्पद म्हणजे कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने कोरोनाविरुद्धच्या लढ्यात 50 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजे जवळपास 38 लाख रुपये पीएम केयर फंडला दान करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौर्यांवर सातत्याने टीका केली जात होती मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची सकारात्मक प्रतिमा तयार होण्यास त्या दौर्यांचा निश्चितपणे फायदा झाला आहे, हे आता नाकारता येणार नाही. संकटकाळीच स्वत:च्या सामर्थ्यांची जाणीव होत असते. आता कोरोनाच्या संकट काळात ज्या पध्दतीने जवळपास सर्वच देश भारताच्या मदतीसाठी धावून आले आहे, हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारताबाबत असलेल्या विश्वासाचे प्रतिक आहे. राहिला विषय काही आंतरराष्ट्रीय माध्यमांकडून होणार्या बदनामीचा तर त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोंदींचे टीकाकार व शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची शंका खरी वाटते.