आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त एड्स जनजागृती अभियान

0

फैजपूर । धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय छात्र सेना आणि ग्रामीण रुग्णालय, न्हावी आयसीटीसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स आजारातील जनजागृती, रेड रिबन क्लबची स्थापना आणि एचआयव्ही तपासणी याबद्दल मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.

व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प
आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या औचित्याने युवकांना व्यसनाधीनता, नकारात्मकता, आजारपण आदींपासून दूर करुन त्यांच्यातील सळसळत्या तारुण्याचा, सकारात्मक ऊर्जेचा समाज उत्थानासाठी विधायक वापर करण्याच्या उदात्त हेतुने महाविद्यालयाने संकल्प केला. त्याचाच परिपाक म्हणून एड्स सारख्या महाभयंकर आजारापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि तरुणांच्या माध्यमातून समाजमनापर्यंत पोहचण्याच्या हेतुने ग्रामीण रुग्णालय, न्हावी येथील आयसीटीसी समुपदेशक मनोज चव्हाण, राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम समुपदेशक सोपान बादशहा आणि आयसीटीसी लॅब टेक्निशियन पौर्णिमा चौधरी यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

रेडरिबन क्लबची स्थापना
शिबिरादरम्यान मनोज चव्हाण यांनी एड्स आजाराविषयी सविस्तर माहिती सांगितली. यावेळी 15 विद्यार्थ्यांच्या सहभागातून प्रथम वर्ष कला वर्गातील विद्यार्थी, विद्यार्थिनींचा रेड रिबन क्लब स्थापन करण्यात आला. त्यांच्या माध्यमातून परिसरात पथनाट्य, रॅली, मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात येतील. सहभागी विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयातर्फे विशेष प्रशिक्षण देण्यात येईल. यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.पी.आर. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.डॉ. जी.जी. कोल्हे, प्रा.डॉ. शरद बिर्‍हाडे, प्रा. लेफ्ट. आर.आर. राजपूत, भुषण तायडे, हुसैन शहा, वैशाली निंबाळकर, विशाखा इंगळे, गायत्री कोळी, आशिष तडवी, फिरोज तडवी, कृष्णा सोनवणे आदींनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन प्रा. लेफ्ट. राजेंद्र राजपूत यांनी केले.