मुंबई नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर राज्याचा सकल राष्ट्रीय उत्पादनाचा दर वाढेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत व्यक्त केला. नवी मुंबई विमानतळासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. मुंबई विमानतळावर एकच धावपट्टी असल्यामुळे अनेक विमानांना उतरण्याची परवानगी दिली जात नाही याचा परिणाम पर्यंटनासह अनेक क्षेत्रावर होत असल्याचं ते म्हणाले.
नवी मुंबई विमानतळ ट्रान्स हार्बर, मेट्रो तसंच जलवाहतुकीने जोडले जाणार असून ट्रान्स हार्बर लिंकचं काम विमातळाचं काम झाल्यानंतर आठ ते नऊ महिन्यात पूर्ण होईल तसंच जलवाहतुकंही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितले. नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर नवी मुंबई,मुंबई, पुणे ,नाशिक हा कॉरिडॉर विकसित केला जाईल अशी माहिती त्यांनी दिली .या विमानतळासाठी जमिनीच्या मोबदल्याबाबत प्रकल्पबाधीत समाधानी असून जुन्या घरांचा वाद आहे तो लवकरच सुटेल असं ते म्हणाले.
प्रकल्पाला आवश्यक असलेल्या भूसंपादनाचा प्रश्न निकाली निघाला आहे. प्रकल्पामुळे बाधित होणार्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे आणि २०१९ पर्यंत पुनर्वसनाच्या पहिल्या टप्प्याचे मोठे काम पूर्ण होईल अशी माहिती मुख्यामंत्र्यानी विधान परिषद सभागृहात दिली. पुनार्वसनाच्या पहिल्या टप्प्याचे काम सिडको पाहत असून त्यातला पहिला प्री डेव्हाल्पिंग वर्कचा टप्पा सुरू झाला असल्याची माहिती त्यानी दिली. कमी खर्चात तयार झालेल्या कोची विमानतळाचा आदर्श ठेऊन या विमानतळाचं मोठ्या प्रमाणात काम 2019 पर्यंत पूर्ण होईल असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.