जळगाव। वस्तू संग्रहालयात विविध ऐतिहासिक वस्तू आणि ऐतिहासिक दस्तऐवजांचे जतन करुन ठेवलेले असते. या वस्तू संग्रहालयांना लहान मुले, विद्यार्थी यांची भेट घडवून तेथील ऐतिहासिक ठेवा त्यांना दाखवावा व पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज येथे केले.
मान्यवरांनी आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाचे सांगितले महत्त्व
जुन्याकाळातील वस्तू ज्या आज वापरात नाहीत, त्या वस्तू जतन करुन एखाद्या संग्रहालयास द्या. त्यामुळे या वस्तूंची माहिती नवीन पिढीला होईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रास्ताविकातून आश्वीन झाला यांनी आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाचे महत्त्व सांगितले. तर भुजंगराव बोबडे यांनी ‘स्थानिक वारसा संग्रहालयांच्या संवर्धनात प्रशासनाचे योगदान’ या विषयावर सादरीकरण केले. आपल्या सादरीकरणात त्यांनी जळगाव जिल्ह्यातील ऐतिहासिक महत्त्वाच्या वास्तू व जिल्ह्यातील संग्रहालयांची माहिती सांगितली. दलूभाऊ जैन यांनी पूर्वजांनी मेहनतीने जतन केलेला ऐतिहासिक वारसा पुढच्या पिढीसाठी संरक्षित ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच राजन अट्रावलकर यांनी त्यांच्या स्वतःच्या मुगलकालीन नाणे संग्रहाबद्दल उपस्थितांना माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष भिंगार्डे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव, जिल्हा परिषद, जळगाव व गांधी रिसर्च फाऊंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, उपविभागीय अधिकारी जलज शर्मा, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष दलुभाऊ जैन, भुजंगराव बोबडे आदी उपस्थित होते.