पुणे : पुण्यात आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट मोठ्या प्रमाणात सक्रीय असून, त्या रॅकेटअंतर्गत विदेशी वारंगणा पुणेकरांच्या शरीरसेवेसाठी पुरविल्या जात आहेत. त्यांना शरीरविक्रयापोटी घसघशीत रक्कमही मिळत असल्याची माहिती या क्षेत्रातील जाणकाराने नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर दिली. पुण्यातील कोरेगावपार्क, हिंजवडी, एफसी रोड, कल्याणीनगर या उच्चभ्रू वसाहतीत या विदेशी वारंगणांचा वावर वाढला असून, गेल्या काही दिवसांत तब्बल 19 जणींची सुटका पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने केली आहे. त्यांच्याविरुद्ध भारतीय कायद्यानुसार विविध कलमान्वये गुन्हेदेखील दाखल करण्यात आलेले आहेत. या वारंगणा शहरातील मसा पार्लर, स्पा आणि विविध हॉटेलमध्ये आपली सेवा उच्चभ्रू ग्राहकांना देत होत्या.
बूकिंगसाठी सोशल मीडियाचा वापर
गौरवर्ण आणि विदेशी स्त्रीचे भारतीयांना असलेले आकर्षण पाहाता, पुण्यातील उच्चभ्रूवर्गात या विदेशी वारंगणांची खास मागणी होत आहे. त्यापोटी मोठी रक्कमही त्यांना मोजली जात आहे. या वारंगणांच्या बूकिंगसाठी सोशल मीडिया व माहिती तंत्रज्ञानाचा अचूक वापर हे विदेशी सेक्स रॅकेट चालविणारे करत आहेत. उच्चभू्र व्यावसायिकवर्गातून या विदेशी वारंगणांची पंचतारांकित हॉटेल्समध्ये मागणी होत आहे. पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने विविध हॉटेल, स्पा आणि मसाज पार्लरवर छापे टाकून गेल्या काही दिवसांत तब्बल 19 विदेशी वारंगणा ताब्यात घेतल्या होत्या. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांची सुटका करण्यात आली होती. उझबेकिस्तान, थायलंड या देशातून खास करून या महिला शरीरविक्रयासाठी पुण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्या 19 जणींची सुटका झाली त्यात सर्वाधिक 10 या थायलंडच्या रहिवासी तर इतर वारंगणा या नेपाळ, रशिया, उझबेकिस्तान, तुर्किमेनिस्तान आणि पाचजणी या बांगलादेशातून आलेल्या होत्या. यापैकी बहुतांश जणींकडे पर्यटक व्हिसा आढळून आलेला आहे.
व्हॉटसअॅपद्वारे चालते सेक्स रॅकेट
गेल्या काही दिवसांपासून अचानक सेक्स ट्रेड वाढल्याबद्दल पोलिसांनीदेखील आश्चर्य व्यक्त केले आहे. नोटाबंदीच्या काळानंतर वेश्या व्यवसायात मरगळ आल्याची माहिती सरकारमधील काही घटक देत असताना, नोटाबंदीच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर विदेशी वेश्यांची पुण्यात मागणी वाढल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या तरुण वेश्या व्हॉटसअॅपद्वारे सेक्स रॅकेटमधील दलालांच्या संपर्कात राहात असून, पर्यटक व्हिसावर वारंवार भारतात येत आहेत. पुण्यातील एजंट हे ग्राहकांना व्हॉटसअॅपद्वारे या वेश्यांचे छायाचित्र ग्राहकांना पाठवतात, त्यातील जी वेश्या पसंत केली जाईल तिला ग्राहकांच्या सेवेसाठी पुण्यात बोलावले जाते, अशी माहितीही सूत्राने दिली आहे. या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात पंचतारांकित हॉटेल्स, स्पा व काही मसाज सेंटर आपल्या रूम उपलब्ध करून देत असून, त्यातून त्यांनाही बक्कळ कमाई होत आहे. काउंटर चार्जच्या नावाखाली दोन हजार रुपये, त्यानंतर अवघ्या काही तासासाठी चार ते पाच हजार रुपये ग्राहक या विदेशी वारंगणासाठी मोजत आहेत, असेही सूत्राने सांगितले.