चंदिगढ : आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचा (एफआयएच) वार्षिक पुरस्कार कार्यक्रम आज, २३ फेब्रुवारीला चंदिगढ येथे होणार आहे. भारताच्या पुरुष संघाचा प्रेरणादायी संघनायक पी. आर. श्रीजेश व वेगाने उदयास आलेला ड्रॅग-फ्लिकर हरमनप्रीत सिंग हे दोघे अनुक्रमे वर्षांतील सर्वोत्तम गोलरक्षक आणि सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू या पुरस्कारांसाठी शर्यतीत आहेत.
हे पुरस्कार वितरण प्रथमच औपचारिक कार्यक्रमात होत असून, २०१६ या वर्षांतील सर्वोत्तम खेळाडू, गोलरक्षक, उदयोन्मुख खेळाडू, प्रशिक्षक आणि पंचांना या वेळी गौरवण्यात येणार आहे. श्रीजेशच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या वर्षी आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेचे विजेतेपद आणि चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे रौप्यपदक जिंकले होते. याचप्रमाणे लखनौ येथे मागील वर्षी झालेल्या कनिष्ठ गटाच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत हरमनप्रीतने लक्षणीय कामगिरी केली होती. हा संपूर्ण कार्यक्रम ‘एफआयएच’च्या यू-टय़ूब वाहिनीवर थेट प्रक्षेपित केला जाणार आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बात्रा यांनी दिली. सर्वोत्तम प्रशिक्षकासाठी कार्लोस रेटेग्यू (अर्जेटिना), डॅनी केरी (ग्रेट ब्रिटन), शेन मॅकलीऑड (न्यूझीलंड); अॅलायसन अॅनन (ऑस्ट्रेलिया), जॅनीके स्कॉपमन (अमेरिका), कॅरेन ब्राऊन (गेट्र ब्रिटन) यांच्यात चुरस आहे.