आंतराष्ट्रीयस्तरावर खादीला पोहोचवतोय जळगावचा तरुण

0

मुंबई (निलेश झालटे):- भारत सरकारने खादीच्या कपड्यांवर भर देण्यासाठी विशेष योजना आखल्या आहेत. स्वतः प्रधानमंत्री देखील खादी वापरावर भर देत आहेत. या खादीचा वापर युवावर्गात वाढावा आणि लोकांनी खादीकडे आकर्षित व्हावे याकरिता जळगावच्या एका तरुणाने ‘मी-खादी’ च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक स्वरूपात चळवळ चालविली आहे. खादीला उद्योगाची जोड देत सचिन पाटील यांनी भारतासह अनेक देशात नव्या स्वरूपात डिझाईन करून खादीला प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. अनेक ई-कॉमर्स कंपन्यांसोबत त्यांनी करार केला असून देश-विदेशात मोठ्या प्रमाणावर त्यांनी तयार केलेले खादीचे उत्पादन विकले जात आहे.

जळगावात झाले शिक्षण
सचिन पाटील सध्या मुंबईत वास्तव्यास आहेत. त्यांचे मूळ गाव भडगाव तालुक्यातील वडगाव. मात्र ते जळगावात राहिले. नूतन मराठा कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्यानंतर फॅशन क्षेत्रात आवड असल्यामुळे 18 वर्षांपूर्वी मुंबई गाठली. मुंबईत असलो तरी गावाकडची ओढ नेहमीच लागलेली असते असे सचिन पाटील सांगतात.

काय आहे मी-खादी
मुंबईत आल्यावर फॅशन क्षेत्रात काम करत असताना त्यांनी खादीवर रिसर्च केला. त्यांना खादी ग्रामोद्योगकडून देखील याकामी मदत झाली असल्याचे ते सांगतात. त्यांनी मीखादीडॉटकॉम नावाची एक वेबसाईट तयार केली आहे. यावरून खादीवर आकर्षक असे डिझाइन करून विक्री केली जाते. तसेच स्नॅपडील, इंडिया मार्ट अशा नामांकित ई कॉमर्स कंपन्यांशी देखील त्यांनी खादी विक्रीबाबत करार केलेला आहे. सिंगापूर, लंडन, इटली, न्यूयॉर्क आणि अनेक देशांमध्ये त्यांनी खादीचे प्रदर्शन भरविले आहे.

नावाजलेल्या मंगोस्टीन स्पर्धेत बाजी
फॅशन जगतात मानाची असलेली मंगोस्टीन फॅशन स्पर्धेची महत्वाची असलेली ऑनलाईन स्पर्धा नुकतीच पार पडली. देशभरातून या स्पर्धेत निवडण्यात आलेल्या मोजक्या दहा ब्रांडमध्ये सचिन पाटील यांच्या मराठमोळ्या ‘मि खादी’ने सर्वाधिक मत मिळवत या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या स्पर्धेचे वैशिष्ट म्हणजे यामध्ये देशभरातून स्पर्धक म्हणून सहभाग नोंदवलेल्या सर्व फॅशन ब्रांडमधून वैशिष्टपूर्ण असलेल्या आणि नव्याने एकाच संकल्पनेवर नव्याने वेगवेगळी मांडणी करू शकणार्या दहाच फॅशन ब्रांडची निवड आयोजकांकडून करण्यात येते.

खादीला तरुणाईला आवडेल तशा आकर्षक स्वरूपात देण्याचा आमचा प्रयत्न असतो. या माध्यमातून खादीचा प्रचार होतोय हे सर्वात महत्वाचे आहे. जास्तीत जास्त मराठी उद्योजक या माध्यमातून उभारण्याचा माझा मानस आहे.
सचिन पाटील
संस्थापक, मि-खादी