आंदर मावळातील ऐतिहासिक कांब्रे लेणी प्रकाशात

0
गडकल्याण प्रतिष्ठानसह गावकर्‍यांचा उपक्रम
तळेगाव दाभाडे : आंदर मावळातील कांब्रे गावाजवळ असलेली ऐतिहासिक लेणी गडकल्याण प्रतिष्ठान आणि गावकर्‍यांच्या मदतीने प्रकाशझोतात आणण्यात आली. आंदर मावळ प्रांतातील कांब्रे  गावाजवळ असलेल्या डोंगराच्या कातळात ही लेणी आहे. प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी लेणीची स्वच्छता मोहीम राबवून लेणीकडे जाण्याचा दिशादर्शक फलक लावला. या मोहिमेत गडकल्याण प्रतिष्ठानचे संस्थापक सुभाष देशमुख, सभासद गोपाळ भंडारी, गणेश जाधव, अमृता पाटील, रोहित वाघमारे, प्रशांत माने, आनंद भालेराव, हनुमंत नाईकनवरे, रोशन तांदळेकर, सुनील जाधव, राजेंद्र चौधरी, रामदास गायकवाड, बाल शिवभक्त वेदांत देशमुख, तुषार आलम, स्थानिक ग्रामस्थ रामदास आलम, अनिल आलम, दिनेश आलम, बंडू आलम आदींनी सहभाग घेतला. मावळ प्रांत प्राचीन इतिहास आणि वास्तू संपन्न प्रदेश आहे. इतिहासाची साक्ष देणारे अनेक गडकिल्ले, लेणी, वाडे आजही दुरावस्थेत अखेरची घटका मोजत आहेत. डोंगर दर्‍यातील असा प्राचीन ठेवा काही निवडक लोकांना, गावकर्‍यांनाच माहिती असतो. कांब्रे येथे अशीच एक उपेक्षित लेणी आढळली. या लेणीमध्ये पाण्याची टाकी, लाकडी चौकटी असलेले बांधकाम, दगड मातीतील भिंती, दगडात कोरलेल्या क्रीडाकृती आणि विविध प्रकारच्या वापरातील वस्तु आढळल्या.
नुकतीच स्वच्छता मोहीम राबविली
गडकल्याण प्रतिष्ठानचे संस्थापक सुभाष आलम-देशमुख म्हणाले की, ही दुर्लक्षीत लेणी सर्वांच्या परिचयाची व्हावी यासाठी गडकल्याण प्रतिष्ठानच्यावतीने नुकतीच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत लेणीकडे जाणार्‍या वाटेवर मार्गदर्शक फलक लावण्यात आले. गडकल्याण प्रतिष्ठान यांच्या या मोहिमेमुळे आंदर मावळातील उपेक्षीत लेणी सर्वांसमोर आली. आंदर मावळात अशा बर्‍याच वास्तू असून त्या गडकल्याण प्रतिष्ठानच्यावतीने आणि अनेक दुर्गप्रेमी संस्थांच्या मदतीने त्यांचे कसे संवर्धन करता येईल.