घरकुलाच्या लाभासाठी मुख्याधिकाऱ्यांना घेराव
भुसावळ :शहरातील पंतप्रधान आवास योजनेंतर्गत लाभार्थींना घरकुल मिळण्याबाबत दिरंगाई होत असल्याने माजी नगरसेवक दीपक धांडे यांनी बुधवारी पालिका आवारात निदर्शने करण्यासंदर्भात एक दिवस आधीच मुख्याधिकारी प्रशासनाला पूर्वकल्पना दिली होती मात्र बुधवारी दुपारी 1.10 वाजेच्या सुमारास आंदोलक महिला पालिकेत पोहोचल्यानंतर मुख्याधिकारी वाहनात बसून जेवणासाठी निघाल्यानंतर आंदोलकांनी त्यांचा पळत जावून पाठलाग करीत त्यांचे वाहन थांबवल्याची सिनेस्टाईल घटना पालिकेजवळ घडली. या घटनेनंतर आंदोलक महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत घोषणाबाजीदेखील केल्यानंतर मुख्याधिकारी पालिकेत परतल्या व त्यांनी आंदोलकांशी चर्चा करीत निवेदन स्वीकारले. याप्रसंगी त्यांनी घरकुलांच्या 36 फायलींवर स्वाक्षरी केल्याची माहिती दिली. माजी नगरसेवक दीपक धांडे यांनी 7 नोव्हेंबर 2019 रोजी शहरातील पंतप्रान आवास योजनेंतर्गत लाभार्थींना घरकूल मिळण्यासंदर्भात पालिकेला निवेदन दिले होते मात्र 12 दिवस उलटूनही दखल घेण्यात न आल्याने धांडे यांनी पालिकेच्या आडमुठे धोरणाविषयी संताप व्यक्त करीत बुधवारी निदर्शने आंदोलनाचा इशारा एक दिवस आधीच दिला होता.
आंदोलकांचा तीव्र संताप
बुधवारी दुपारी 1.10 वाजेच्या सुमारास माजी नगरसेवक दीपक धांडे यांच्या नेतृत्वात लाभार्थी महिला आंदोलक पालिका आवारात पोहोचल्या मात्र त्याचवेळी मुख्याधिकारी करुणा डहाळे या शासकीय वाहनातून जेवणासाठी घराकडे निघाल्याने आंदोलकांनी त्यांचा पाठलाग करीत वाहन थांबवत संताप व्यक्त केला. आंदोलकांच्या संतापामुळे मुख्याधिकारी निवेदन घेण्यासाठी पुन्हा पालिकेत परतल्या. यावेळी पुन्हा आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी जिंदाबादच्या तर मुख्याधिकारी प्रशासनाविरोधात तीव्र शब्दात घोषणाबाजी केली. मुख्याधिकारी पालिकेत माघारी आल्यानंतर आंदोलकांनी त्यांना निवेदन दिले. याप्रसंगी मुख्याधिकार्यांनी 36 घरकुलांच्या फायलींवर स्वाक्षरी केल्याची माहिती दिली.
पालिका प्रशासनाला दिले निवेदन
याप्रसंगी मुख्याधिकार्यांना निवेदन देण्यात आले. गोरगरीब नागरीकांना नगरपालिकेचे लायसन्स अभियंता यांच्यामार्फत प्रस्ताव सादर करण्यासाठी पाच ते आठ हजार रुपये खर्च आला असून घरकुल अनुदानाचा लाभ त्यांना तातडीने मिळणे गरजेचे असून पालिकेच्या आडमुठे धोरणामुळे गोरगरीबांच्या फायली पालिकेत धूळखात पडून असल्याचे नमूद करण्यात आले तर कंत्राट तत्वावर तीन अभियंत्यांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली. निवेदनावर दीपक धांडे, उद्धव सोनवणे, शांताराम भोई, सुनंदा अहिरे, सुभद्राबाई शिंदे, प्रकाश कुर्हे, सुनंदा सुरवाडे, छाया वाघ, राजेंद्र सोनवणे, रीतेश वाघुळे आदींसह 32 नागरीकांच्या स्वाक्षर्या आहेत.
आंदोलन केवळ स्टंटबाजी -मुख्याधिकारी
पाठलाग करीत एखाद्या महिला मुख्याधिकार्यांना थांबणे निश्चितच योग्य नाही. आंदोलन केवळ स्टंटबाजीसाठी करण्यात आले. यापूर्वीच आपण 36 फायलींवर स्वाक्षर्या केल्या असल्याचे मुख्याधिकारी करुणा डहाळे यांनी सांगितले.