पिंपरी । महावितरण कंपनीच्या हलगर्जी कारभारामुळेे नागरिकांना एकीकडे त्रास होत आहे. तर दुसरीकडे वाढत्या वीजबिलामुळे ग्राहकांचे बजेट कोलमडत आहे. तसेच वीजपुरवठादेखील अनियमित आहे. या सर्व बाबींवर महावितरणने जर ठोस पाऊले उचलली नाहीत तर ग्राहकांच्या हितासाठी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे. याबाबत महावितरण प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, महावितरणच्या अंदाधुंद कारभारामुळे शहरातील लाखो वीज ग्राहकांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. वेळेवर मीटर रिडींग न घेणे, विलंब शुल्क, वाढीव बिले, बिलाचे वाटप वेळेत न करणे, या कारणांमुळे वीज ग्राहकांना मानसिक व आर्थिक मनस्ताप सहन करावा लागत आहे. महावितरण पिंपरी-चिंचवड शहराला नियमित वीजपुरवठा देण्यात अपयशी ठरत आहे. फोनवर तक्रार करायला गेले असता, अधिकारी फोन उचलत नाहीत व कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देतात. महावितरणने वीज ग्राहकांना दर्जेदार सेवा द्यावी तसेच वेळेवर योग्य वीजबिले द्यावीत, अशी मागणी आहे.