आंदोलनाची ढोंगं कशाला?

0

अकोल्यात माजी केंद्रीय मंत्री व भाजपनेते यशवंत सिन्हा यांनी शेतकरीप्रश्नी नाटकी आंदोलन सुरु केले आहे. हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनावरून लक्ष हटविण्यासाठीची खेळी असून, स्थानिक शेतकरी नेत्यांच्या कार्यकर्त्यांत फूट पाडणारी आहे. मुख्यमंत्री, भाजप अन् संघाने खेळलेल्या खेळीतून काहीही साध्य होणारे नाही. आपला नेता म्हणून विदर्भ सिन्हांना स्वीकारणार नाही, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ असले तरी, या ढोंगी आंदोलनाच्या प्रयत्नातून सत्ताधार्‍यांचा कुटील मेंदू चव्हाट्यावर आला आहे.

शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी भाजपचे बंडखोर नेते यशवंत सिन्हा यांनी विदर्भातील अकोला येथे आंदोलनाचे रणशिंग फुंकलेले दिसते. त्यांच्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हेदेखील दिसून येतात. सद्या भाजप सरकारविरोधात शेतकरी बांधवांमध्ये कमालीचा असंतोष खदखदत असून, या असंतोषाची धग पश्चिम महाराष्ट्रापेक्षा विदर्भात सर्वात जास्त आहे. नेमके याच संधीचा फायदा उचलण्याचा सिन्हा यांचा व त्यांच्याआडून सत्ताधारी भाजपचाच प्रयत्न दिसतो. मुळात राजधानी दिल्लीत वावरलेले व मूळचे बिहारचे असलेले सिन्हासारखे नेतृत्व विदर्भात आयात करण्याची गरज का भासावी? स्थानिक नेत्यांच्याबाबतीत विदर्भ वांझोटा आहे का? शेतकरीप्रश्नांची चांगली जाण असलेले आणि अनेक आंदोलनांचे रान पेटविणारे प्रकाश पोहरे यांच्यासह विजय जावंधिया, किशोर तिवारी या नेत्यांना डावलून सिन्हांचे नेतृत्व विदर्भावर लादण्याची खेळी भाजपला का खेळावी वाटते आहे? स्वामिनाथन आयोग लागू करावा, संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतमालाला योग्य भाव मिळावा, शेतकर्‍यांची आर्थिक उन्नती व्हावी आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर हल्लाबोल आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन सद्या विदर्भात असून, या आंदोलनाची हवा काढून घेण्यासाठी; तद्वतच समांतर आंदोलन उभे करण्यासाठीच भाजपच्या एका गटाकडून सिन्हांचे पार्सल अकोल्यात धाडण्यात आलेले आहे. कापूस-सोयाबीन-धान (कासोधा) परिषदेच्यानिमित्ताने सिन्हा आपल्या आंदोलनाची हवा गरम करत आहेत, त्याप्रमाणे राष्ट्रवादीच्या हल्लाबोल व इतर शेतकरी नेत्यांच्या आंदोलनावरून लोकांचे लक्ष वळविण्याचेही काम करत आहेत. सत्ताधारी भाजपची ही खेळी शेतकर्‍यांच्या लक्षात आली नाही, असे नाही. ती वेळीच शेतकर्‍यांच्या लक्षात आली; म्हणूनच सिन्हा यांच्या नेतृत्वात शेतकरी जागर मंचतर्फे सुरु असलेल्या आंदोलनाकडे लोकांनी पाठ फिरविली. तरीही हे आंदोलन पेटते ठेवण्यासाठी सिन्हा यांनी स्वतःला अटक करून घेण्याचे नाटक रचले; शिवाय इतरही अडिचशे शेतकर्‍यांना अटक करायला लावून आंदोलनाचे नाट्य पुरेपूर उठविण्यात काहीही कसर सोडली नाही.

मुळात या आंदोलनात जे काही अकोल्यातील स्थानिक नेते चमकोगिरी करताना दिसतात, त्यात प्रामुख्याने जगदीश मुरमकर, प्रशांत गावंडे, मनोज तायडे, विजय देशमुख, दिलीप मोहोड आदी मंडळी आहेत. हे सर्व नेते यापूर्वीच्या प्रकाश पोहरे यांच्या विविध आंदोलनातून पुढे आलेले असून, पोहरे यांनीच या लोकांना मोठे केलेले आहे. त्यामुळे अकोल्यात पोहरेंचा असलेला प्रभाव मोडित काढण्यासाठीच या नेत्यांकडून यशवंत सिन्हाआड हा नतद्रष्टेपणा सुरु आहे. म्हणजे, मुख्यमंत्र्यांनी एका दगडात अनेक पक्षी मारलेत. यशवंत सिन्हा यांच्यासारख्या भाजप बंडखोर नेत्याला आंदोलनासाठी उचकावून राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाला शह देण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे, पोहरे यांच्या नेतृत्वात काम केलेल्या माणसांना फितवून अकोला व एकूणच वर्‍हाड प्रांतात असलेल्या त्यांच्या नेतृत्वाची पकड ढिली करण्याचीही खेळी केली. हा सगळा प्रकार वर्‍हाड व विदर्भातील शेतकर्‍यांच्या लक्षात आला नसेल, असे जर मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर तो त्यांचा निव्वळ गैरसमज आहे. म्हणूनच मूळ शेतकर्‍यांनी या ढोंगी आंदोलनापासून दूर राहणेच पसंत केले आहे.

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने राबविलेल्या अर्थनीतीचा सर्वाधिक फटका बळिराजालाच बसला. त्यामुळे देशभर भाजपविरोधात संतापाची लाट खदखदत आहे. या लाटेचा फटका भाजपला आगामी लोकसभा व काही राज्यांतील विधानसभा निवडणुकांत बसणे निश्चित आहे. त्यामुळेच आपल्याच काही माणसांना या सरकारविरोधी लाटेवर स्वार होण्यासाठी बंडाची भाषा करायला लावाची; अन् आपल्याच माणसांनी पुन्हा शेतकरीवर्गाचे नेते म्हणून अशी आंदोलने हाती घ्यायची, आणि याच माणसांमार्फत आम्ही तुमच्या मागण्या मान्य करत आहोत, असे भासवून आंदोलने गुंडाळायची; अशी खेळी संघ-भाजपच्या सुपिक डोक्यातून बाहेर पडलेली दिसते. ही खेळी देशवासीयांनी वेळीच सावधपणे लक्षात घ्यायला हवी. यशवंत सिन्हा हे मोदीविरोधात बोलत असले तरी ते भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे सुपुत्र केंद्रात मंत्री आहेत. त्यामुळे सिन्हा यांना सर्वाधिक असंतोष खदखदत असलेल्या अकोल्यात पाठवून रा. स्व. संघाच्या धुरिणांनी व खुद्द मुख्यमंत्र्यांनी केलेली खेळी यशस्वी होईल असे त्यांना वाटत असले तरी तो त्यांचा नुसता भ्रमाचा भोपळा आहे. लवकरच हा भोपळा फुटेल.

अकोला-विदर्भाची जनता बाहेरचे नेतृत्व कदापिही स्वीकारणार नाही. आजपर्यंत असे प्रयोग झाले नाहीत, असे नाही. परंतु, प्रत्येकवेळी ते प्रयोग अयशस्वी झालेत. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्वही अकोल्यावर लादण्याचा प्रयत्न झाला होता. हा प्रयत्न यशस्वी झालेला नाही. अ‍ॅड. आंबेडकरांचे पार्सल पुन्हा एकदा मुंबईला पाठविण्यात आल्याचे दिसून आले. तथापि, आंबेडकर यांनी ओबीसी-दलित सोशल इंजिनिअरिंगचा जो फॉर्म्युला अकोला जिल्ह्यात राबविला, तो मात्र यशस्वी झाल्याचे दिसून येते आहे, तेवढी एक जमेची बाजू म्हणता येईल. यशवंत सिन्हा किंवा पश्चिम महाराष्ट्रातील राजू शेट्टी यांचेसारखे नेतृत्वही असेच स्थानिक शेतकरी झिडकारतील आणि हे पार्सलही मूळजागी परत पाठविल्या जाईल, ही बाब अगदी सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे. पोहरेंच्या विविध आंदोलनातील माणसे फोडून ती आपल्या पदराखाली घ्यायची, त्यांना सरकारची रसद पुरवायची व आंदोलनाची हवा निर्माण करून हल्लाबोल आंदोलनाची हवा काढून घ्यायची हे मुख्यमंत्र्यांसह संघ व भाजपच्या नेतृत्वाने लावलेले डोके कौतुकास्पद असले तरी वास्तवाची भान त्यांच्या या प्रयत्नांना नाही. पोहरेंची माणसे फोडण्याऐवजी पोहरेंनाच आंदोलनात सहभागी केले असते तर फसलेल्या या आंदोलनाची परिस्थिती वेगळी असती. शेतकरी आंदोलने कशी चालवावी लागतात, याचा काडीचाही अनुभव नसलेले सिन्हांसारखे नेतृत्व काय आंदोलन करणार? अन् काय शेतकर्‍यांना न्याय मिळवून देणार? प्रसारमाध्यमांना हाताशी धरून तुम्ही वातावरणनिर्मिती करू शकता, परंतु खचलेल्या शेतकर्‍याला रस्त्यावर उतरविण्यासाठी कसे उद्युक्त करणार? ढोगं करून काहीही होत नाही, त्यासाठी तेथे पाहिजे जातीचे? हे या मुख्यमंत्र्यांना अन् संघाला कळायला हवे!