आंदोलनाच्या इशार्‍यामुळे वैद्यकिय अधिकार्‍याची नियुक्ती

0

वरणगाव। येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकार्‍यांना कार्यमुक्त केल्याने वारेवर असलेल्या ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरअभावी रुग्णावर उपचार होत नव्हते. यामुळे येथील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष व पालिकेच्या आरोग्य सभापती यांनी एक आठवड्यात वैद्यकीय अधिकार्‍याची नियुक्ती न झाल्यास यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. यामुळे जळगाव जिल्हा शल्यचिकित्सक यांनी एक वैद्यकीय अधिकार्‍याची नियुक्ती केली आहे. रुग्णालयात चार वैद्यकीय अधिकारी मंजूर पदे असतांना फक्त एकच वैद्यकिय अधिकारीपद नियुक्ती झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आरोग्य सभापती काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गरीब रुग्णांची होते अडचण
वरणगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसल्याने चर्चेत होते. डॉक्टर हर्षल चांदा एकमेव अधिकारी 24 तास काम करत रुग्णांना सेवा देण्याचे काम करीत होते. मात्र त्यांची अचानक जामनेर येथे बदली करून पर्यायी अधिकारी नसतांना देखील त्यांना कार्यमुक्त केले. यामुळे येथील आरोग्य सेवेवर चांगलाच परिणाम झाला. सकाळी 9 ते 12 या वेळेस शालेय पोषण विभागाचे डॉक्टर बाह्यरुग्ण तपासणीचे काम करीत होते. मात्र आंतररुग्ण करण्यासाठी जबाबदार अधिकारी नसल्यामुळे रुग्णांना खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घ्यावे लागत.

आठवडाभराची दिली होती मुदत
गंभीर रुग्णांना माघारी जावे लागत होते. यामुळे जनपक्षोभ वाढत होता. यामुळे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संतोष माळी यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना एक आठवड्यात वैद्यकीय अधिकार्‍यांची नियुक्तीची मागणी केली होती. तसेच नगरपालिकेच्या आरोग्य सभापती माला मेढे यांनीदेखील मागणी केली होती. अन्यथा दोघांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी डॉ. राहुल साळुंके यांची तडकाफडकी नियुक्ती केली आहे.

आंदोलनाकडे लक्ष
रुग्णालयात चार वैद्यकीय अधिकार्‍यांची पदे असतांना केवळ एकच वैद्यकीय अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात आली. यामुळे एकाच वैद्यकीय अधिकार्‍यावर कामाचा भार जास्त वाढतो. तसेच सुटीवर गेले असता आरोग्य सेवेवर परिणाम होतो. यामुळे येथे जास्तीचे वैद्यकीय अधिकारी असणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष माळी व आरोग्य सभापती माला मेढे यांची आंदोलनाच्या दिशेकडे लक्ष लागून आहे.