गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी घेतला आंदोलनाचा आढावा
मुंबई – मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर आंदोलनाचा उद्रेक झाला असून यात काही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्याठिकाणी पाहणीसाठी जाणार असून या आंदोलनात काही बाहेरच्या लोकांचा सहभाग आहे का? याबाबत आम्ही चौकशीही करणार आहोत, असे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. मंगळवारी केसरकर यांनी मंत्रालयात चाकण आणि सोलापूरमध्ये उसळलेल्या आंदोलनाचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
हे देखील वाचा
मोर्चेकरी हिंसा करतील अशी शक्यता कमीच
पुण्याजवळील चाकणमध्ये मोठ्या प्रमाणात सरकारी यंत्रणेचे नुकसान झाले आहे. आंदोलकांच्या दगडफेकीत काही पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. त्या जखमी पोलिसांची मी आज तिथे जाऊन विचारपूस करणार आहे. या आंदोलनात काही बाहेरच्या लोकांचा ही सहभाग असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत आताच निष्कर्षाला पोहोचणे योग्य होणार नाही. पुरेसे पुरावे हाती आल्यावर बोलणे योग्य ठरेल. घटनेच्या ठिकाणी सीसीटीव्ही, पोलिसांची माहिती यानुसार तपास केला जाईल. मात्र, आंदोलनाचा इतिहास बघता मोर्चेकरी यामध्ये काही हिंसा करतील, अशी शक्यता फारच कमी आहे, असेही त्यांनी म्हटले.
आंदोलकांना अजूनही मी शांततेचे आवाहन करतो. जेव्हा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते तेव्हा त्याबद्दलची वसुली झाल्याशिवाय गुन्हे मागे घेतले जात नाही, कोर्ट याबाबत निर्णय घेते. सर्वांनी या परिस्थितीत सहकार्य करणे गरजेचे आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत कटिबद्ध आहे. माझी खात्री आहे, विशेष अधिवेशनानंतर या विषयावर नक्कीच परिणामकारक तोडगा निघेल, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.