सोयगाव । गेल्या तीन वर्षापासून सोयगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात वैदकीय अधिकारी नसल्यामुळे सतंप्त शेतकर्यांनी 30 नोव्हेंबर रोजी गट विकास अधिकारी यांच्या दालनाला शेळ्या बांधून पंचायत समिती कार्यालयाला कुलुप ठोकले होते. त्यानुसार शेतकर्यांच्या या आंदोलनाची दखल घेत तीन डॉक्टरांना दोन दोन दिवस ड्यूटी बजावण्याचे आदेश देण्यात आले आहे. सोयगाव येथील पशु वैद्यकीय दवाखान्यात पद रिक्त आहे. तीन वर्षापासून वैद्यकिय अधिकारी नसल्यामुळे पशु पालकांचे हाल होत आहे. पशुसंवर्धन विभागाच्या अनेक योजनांपासुन शेतकरी वंचित राहत आहे. याविषयी अनेक वेळा निवेदन देऊनही अधिकारी उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे गणेश काळे, राजू दुतोंडे,शालिक अप्पा देसाई, सुनिल काळे, पुनम परदेशी, शिवाजी गुंजाळ, विकास काळे, सोपान गाजरे, बबन बीर्हारे आदींसह संतप्त शेतकर्यांनी 30 नोव्हेंबर रोजी उपचारासाठी आणलेल्या शेळ्या गट विकास अधिकारी यांच्या दालनांत बांधल्या व पंचायत समितीच्या कार्यालयाच्या मुख्य दरवाजास कुलुप ठोकले.
3 डॉक्टरांचा 2 दिवसाचा पदभार
या प्रकरणाची दखल घेऊन डॉ.आर एस.चौरे यांना सोमवार आणि शनिवार, डॉ.बी.एम.पवार यांना मंगळवार आणि शुक्रवार, डॉ.सय्यद यांना बुधवार आणि गुरुवार असे दोन दोन दिवसाचे नियुक्ति केली असे पत्र गट विकास अधिकारी प्रकाश जोंधळे यांनी आज दिले आज दिनांक 4 रोजी दिले. त्यामुळे आता शेतकर्यांना जनावरे उपचारासाठी आठवडाभर डॉ.उपलब्ध होणार आहे. यावेळी शेतकर्यांच्या वतीने राजू दुतोंडे यांनी गट विकास अधिकारी प्रकाश जोंधळे, सभापती धरमसिंग चव्हाण, जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ.कांबळे यांचे आभार मानले.