आंदोलनापुर्वीच संभाजी सेनेला आश्‍वासन

0

चाळीसगाव । शहरात जवळपास महिना भरापासून नगरपरिषदेच्या घंटा गाड्या बंद असल्याने शहरभर सर्वत्र घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य वाढले आहे आणि त्यामुळे शहरातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. शहरात रोगराईचे प्रमाण देखील खूप मोठया प्रमाणावर वाढले आहे .कचरा साचल्यामुळे बहुतेक ठिकाणी गटारी तुडुंब भरल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. आणि त्यामुळे डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांना जनतेला तोंड द्यावे लागत आहे. आणि म्हणून शहरात घंटा गाड्या नियमित सुरू व्हाव्यात आणि नियमित स्वछता व्हावी, या मागणीसाठी संभाजी सेनेने 31 आक्टोबर रोजी इशारा दिला होता की 6 नोव्हेंबर 2017 पर्यंत घंटा गाड्या पूर्ववत सुरू न झाल्यास 7 नोव्हेंबर 2017 रोजी संभाजी सैनिक न.पा. मुख्यधिकारी यांच्या दालनात कचरा फेको आंदोलन करतील व त्यानुसार आज 7 नोव्हेंबर 2017 रोजी संभाजी सैनिक मुख्याधिकारी यांच्या दालनात कचरा फेको आंदोलन करण्याकरीता गेले असता मुख्याधिकारी हे जागेवर नव्हतेच आणि त्यांचे दालन बंद करून ठेवण्यात आलेले होते. त्यामुळे जनतेच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणार्‍या शासन आणि प्रशासनाच्या विरोधात संभाजी सैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.

महिनाभरात स्वच्छता मार्गी लागण्याचे आश्‍वासन
यावेळी नगराध्यक्षा आशालता चव्हाण, आरोग्य सभापती घृष्णेश्वर पाटील, नगरसेवक राजेंद्र चौधरी, नगरसेवक चांद्रकांत तायडे, यांनी संभाजी सैनिकांना विनंती केली की आपण बसून चर्चा करून काही तरी मार्ग काढू, तेव्हा बंदोबस्तासाठी उपस्थित पोलिसांच्या फौज फाट्याने संभाजी सैनिकांनी कचरा फेको आंदोलनासाठी सोबत नेलेला कचरा जप्त केला. पदाधिकारी यांच्या विनंतीनुसार चर्चा सुरू झाली चर्चेला नगराध्यक्षा आशालता चव्हाण, आरोग्य सभापती घृष्णेश्वर पाटील, नगरसेवक राजेंद्र चौधरी, नगरसेवक चंद्रकांत तायडे, विजया पवार, बापु अहिरे उपस्थित होते. यावेळी तालुकाध्यक्ष गिरिश पाटील, शहराध्यक्ष अविनाश काकडे, शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेन्द्र महाजन, शहरकार्याध्यक्ष ज्ञानेश्वर पगारे, शहर उपाध्यक्ष प्रवीण पाटील, संदीप जाधव, दिवाकर महाले, रवींद्र शिनकर, सुरेश पाटील, गोरख राठोड, ईश्वर अहिरे, बंटी पाटील, बाबा शेख, भूषण मगर, भरत नेटारे, समाधान पाटिल छोटूभाऊ पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

पालिका पदाधिकार्‍यांना धरले धारेवर
संभाजी सैनिकांनी न.पा. पदाधिकार्‍यांना चर्चेत चांगलेच धारेवर धरले. तोंडी आस्वासन आम्हाला चालणार नाही आम्हाला लेखिच लागेल अन्यथा आम्ही येथून उठणार नाही त्यानंतर मात्र संभाजी सैनिकांचे रोद्र रूप पाहून पदाधिकारी यांनी मुख्यधीकार्‍यांशी दूरध्वनी वरून संपर्क साधल्यानंतर एक महिन्यात कचरा उचलण्याचा घंटा गाड्या सुरू करण्याचा प्रश्न मार्गी लावतो असे लेखी पत्र दिले. त्यावेळी संभाजी सैनिकांनी ठणकावले की महिनाभरात घंटा गाड्या सुरू करून शहरातील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी न लावल्यास पदाधिकार्‍यांना शहरात फिरू देणार नाही इशारा देखिल देण्यात आला.