आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना भरधाव ट्रकने चिरडले; 20 जणांचा मृत्यू

0

चित्तूर । आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात धरणे आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना भरधाव ट्रकने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत 20 शेतकर्‍यांचा मृत्यू झाला आहे तर 10 शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. दुर्घटनेनंतर जखमी शेतकर्‍यांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आंध्र प्रदेशमधील चित्तूर जिल्ह्यात पुतलापट्टू-नायडूपेटा या राज्य महामार्गावर पोलीस स्टेशन बाहेर काही शेतकरी आंदोलन करत होते. या आंदोलना दरम्यान त्याच मार्गावरून जाणार्‍या भरधाव ट्रकने या आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांना चिरडले. अवैध वाळू उत्खननाच्या विरोधात मुंनगापालम गावातील 100 पेक्षा जास्त शेतकरी पोलीस स्टेशनसमोर धरणे आंदोलन करत होते. त्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. चत्तूरचे पोलीस अधीक्षक के. एस. नंजनदप्पा यांनी सांगितले की, अवैध वाळू उत्खननाच्या विरोधात मुंनगापालम गावातील 100 पेक्षा जास्त शेतकरी पोलीस स्टेशनवर धरणे आंदोलन करत होते. त्यावेळी मालाने भरलेल्या एका भरधाव ट्रकने शेतकर्‍यांना चिरडल्या नंतर तो ट्रक जवळील एका उच्च दाबाच्या विद्युत पोलला धडकला. त्यामुळे विजेची तार तुटल्यामुळे काही जणांना विजेचे शॉकही बसले. भरधाव ट्रकखाली आल्यामुळे सहा जणांचा मृत्यू झाला तर विजेचा शॉक बसल्यामुळे 14 जणांना जीव गमवावा लागला. काही जखमींना रुइया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर काही जणांना तिरुपती, वेल्लोर येथील रुग्णालयामध्ये नेण्यात आले आहे. मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी शोक व्यक्त केला आहे. पोलीस चालक आणि क्लीनरचा शोध घेत आहेत.