अमरावती: आंध्र प्रदेशात लोकसभा आणि विधानसभेसाठी एकत्रित मतदान होत असून, विधानसभेची निवडणूक लढवणाऱ्या जनसेनेच्या उमेदवाराने मतदान केंद्रात घुसून ईव्हीएम फोडल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर काही वेळ मतदान केंद्रावर गोंधळ उडाला. या प्रकरणी संबंधित उमेदवाराला अटक करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशमध्ये लोकसभेच्या २५ आणि विधानसभेच्या १७५ जागांसाठी एकत्रित मतदान होत आहे. राज्यातील अनंतपूर जिल्ह्यातील गुंटाकल मतदारसंघातील गुट्टी येथील मतदान केंद्रावर जनसेनेचे उमेदवार मधुसुदन गुप्ता आले. ईव्हीएमवर विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघाचे नाव व्यवस्थित दिसत नसल्याने ते मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांवर भडकले. त्यांनी रागानं ईव्हीएम उचलून जमिनीवर आपटले. या घटनेमुळं मतदान केंद्रात काही वेळ गोंधळ उडाला. पोलिसांनी गुप्ता यांना अटक केली आहे.