नवी दिल्ली – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी आज सोमवारी ११ फेब्रुवारीपासून दिल्लीमध्ये एकदिवसीय उपोषणाला सुरुवात केली आहे. विशेष राज्याचा दर्जा न देण्याची भूमिका मोदी सरकारने घेतल्याच्या विरोधात नायडू यांनी उपोषणाचा निर्णय घेतला. महात्मा गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.
दरम्यान काल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आंध्र प्रदेश दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जनसभेला संबोधित करतांना चंद्राबाबू नायडू यांच्यावर टीका केली. केंद्र सरकारने विशेष राज्याच्या बरोबरीने आंध्रला निधी दिला, मात्र तो निधी चंद्राबाबू यांनी व्यवस्थित खर्च केला नाही अशी टीका मोदींनी केली होती.
चंद्राबाबू नायडू हे अनेक दिवसांपासून सातत्याने आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत आहेत. आंध्र प्रदेशची राजधानी असलेल्या अमरावतीत चंद्राबाबू यांनी तेलगू देसम संसदीय पक्षाची बैठक घेतली होती. त्यावेळी उपोषणाचा निर्णय घेण्यात आला होता. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा दिला नाही याच्या निषेधार्थ गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी तेलगू देसम पार्टी रालोआतून बाहेर पडली होती.