पुरंदर । भिवरी येथील आंबराई पाझर तलावाला गळती असल्यामुळे तो कोरडा पडत होता. त्यासाठी त्याच्या दुरुस्ती, मजबुतीकरण, उंची वाढविण्याच्या कामाला पुणे जिल्हा परिषदेच्या छोटे पाटबंधारे विभागाच्या वतीने 24 लाख रुपयांचा निधी देण्यात आला. या माध्यमातून पाझर तलावाचे काम करण्यात आल्याने पहिल्याच पावसाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे, याचा फायदा येथील शेतपिके, फळबाग वाढीसाठी, पिण्याच्या पाण्यासाठी होईल, असे जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष दिलीप यादव यांनी सांगितले.
पाणीपूजन
भिवरी (ता. पुरंदर) येथील आंबराई पाझर तलाव परिसरात जोरदार पाऊस झाल्याने तलाव ओसंडून वाहत आहे. तलावातील पाणीपूजन जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, ज्योती झेंडे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी यादव बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य ज्योती झेंडे, उपसभापती दत्तात्रय काळे, पंचायत समिती सदस्य रमेश जाधव, सखाराम कटके, राजाराम झेंडे, सरपंच लता भिसे, उपसरपंच भाऊसाहेब कटके, मोहन गायकवाड, अनिल ढवळे आदी उपस्थित होते.
शेतकर्यांना फायदा
भिवरी (ता. पुरंदर) येथील आंबराई पाझर तलावाचे काम माजी आमदार संभाजी कुंजीर यांच्या काळात 1982 मध्ये पूर्ण झाले होते. आंबराई पाझर तलावाच्या दुरुस्तीमुळे पुढील 25 वर्षे परिसरातील शेतकर्यांना फायदा होणार आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे पुरंदरचा पश्चिम भागाचा चांगला फायदा झाला आहे. जलसंपदा आणि जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या माध्यमातून या विकास योजना राबविण्यात येत असल्याचे उपसभापती दत्तात्रय काळे यांनी सांगितले. या तलावाखाली आणि आजुबाजूला साधारण 16 विहिरी आणि 10 विंधन विहिरी आहेत. याचा फायदा शेतकर्यांना होईल, असे सरपंच लता भिसे आणि उपसरपंच भाऊसाहेब कटके यांनी सांगितले. प्रास्तविक भाऊसाहेब कटके यांनी केले. सूत्रसंचालन अविनाश निगडे यांनी केले. आभार महादेव फडतरे यांनी मानले.