वडीलांदेखत बिबट्याने बालकाला ओढून नेल्याने कुटुंबिय भयभीत
शहादा – तालुक्यातील अंबापूर येथेऊस तोडणी सुरू असताना उसाच्या शेतात 8 वर्षीय बालकांवर बिबट्याने हल्ला चढवीत बालकाच्या मानेला धरून ऊसाच्या शेतात ओढून नेल्याची घटना सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत बालक ठार झाला असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वडीलांदेखत बिबट्याने बालकाला ओढून नेल्याने त्याचे वडील भयभीत झाले आहेत. घटनास्थळी म्हसावद पोलीसांचे पथक आणि शहादा व राणीपुर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे पथक पोहचले आहे. दरम्यान बिबट्याला हुसकून लावण्यासाठी ऊसाच्या शेताला पेटवून दिले.
अंबापूर ता. शहादा येथे काळूसिंग सुरज्या पावरा यांचे इस्लामपूर शिवारात चार एकर ऊसाचे शेत आहे. या शेतात दुर्गा खंडासरी मार्फत ऊस तोडणी आज पासून सुरू करण्यात आली होती. ऊस तोडणी साठी साक्री तालुक्यातील नागापूर येथील ऊस तोडणी मजूर परिवारासह आले होते. या मजुरांसोबत देवाजी जगताप हे पत्नी व तीन मुलांसाहित आलेला होता. सर्व मजूर ऊस तोडणी करीत असतांना देवाजी जगताप हा देखील ऊस तोडणी करीत होता. त्याच्या जवळ दादू देवाजी जगताप (वय 8 वर्ष) हा त्याचा मुलगा डबा धरून बसलेला होता. सर्व मजूर ऊस तोडणीच्या कामात गर्क असतांना अचानक ऊसाच्या शेतातून आलेल्या बिबट्याने दादू जगताप या बालकावर हल्ला चढवीत त्याच्या मानेला पकडत ऊसाच्या शेतात ओढून नेले. ही घटना सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. वडिलांच्या देखत मुलाला बिबट्याने ओढून नेल्याने शेतातील मजुर भयभीत होऊन पळापळ सुरू झाली.