आंबा निर्यातीचे प्रमाण यंदा पन्नास हजार टनांवर जाणार

0

पुणे : फळांचा राजा समजल्या जाणार्‍या आंब्याचे यंदा देशभरात बंपर उत्पादन अपेक्षित असून, आंब्याला जगभरातून मागणी वाढल्याने निर्यातीचे प्रमाण 50 हजार टनांवर जाण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे यंदा दक्षिण कोरिया, न्यूझीलंड, जपान व ऑस्ट्रेलियातूनही आंब्याला मागणी आली आहे. त्यामुळे यंदा आंबा उत्पादकांना अच्छे दिन येतील, असेही मानले जाते.

देशात महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, गुजरात व उत्तर प्रदेशात आंब्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. त्यातही महाराष्ट्र हा आंबा उत्पादनात अग्रेसर असून, त्या पाठोपाठ कर्नाटक व उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो. आंब्याच्या विविध जातींना दरवर्षी चांगली मागणी असते. त्यातही हापूस, केशर व पायरी या जातींना सर्वाधिक मागणी असते. यंदाही अशी मागणी आता येवू लागली आहे, अशी माहिती पणन महामंडळाचे सहायक सरव्यवस्थापक डी. एम. साबळे यांनी जनशक्तिशी बोलताना दिली.

राज्याच्या पणन महामंडळातर्फे आंबा उत्पादकांना निर्यातीसाठी मार्गदर्शन व अन्य आवश्यक सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातात. गेल्या काही वर्षांपासून विकिरण प्रक्रिया करून आंबा निर्यात केली जाते. मुंबईतील या केंद्राची क्षमता चौपटीने वाढवण्यात आली आहे. तसेच, अमेरिका, युरोपीय देशांच्या तपासणी अधिकार्‍यांनी या केंद्रास भेट देऊन पाहणी केली आहे. यंदा कोरिया, जपान, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या अधिकार्‍यांनीही या केंद्रास भेट देऊन आंबा निर्यातीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. इराणचे अधिकारी उद्या या केंद्रास भेट देणार आहेत, असे साबळे यांनी सांगितले.

दोन लाख टन उत्पादन अपेक्षित
देशात गेल्या वर्षी एक कोटी 86 लाख टन आंबा उत्पादन झाले होते. यंदा ते वाढून 1 कोटी 96 लाख टनांवर जाण्याचा अंदाज या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. गेल्या वर्षी अवेळी पाऊस व गारपिटीमुळे आंबा उत्पादन घटले होते. यंदा मोहोर ते फळधारणा या टप्प्यात अशी कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली नाही. त्यामुळे यंदा उत्पादन वाढणार आहे. तसेच, यंदा फळांचा आकार व चवही चांगली आहे. त्यामुळे आंब्याला चांगला दर मिळेल, असे मानले जात आहे.

युरोप, अमेरिकेला निर्यात सुरू
आखाती देश, युरोपीय देश व अमेरिकेत दरवर्षी आंबा निर्यात केली जाते. यंदा अशी निर्यात सुरू झाली आहे. एप्रिलच्या मध्यापर्यंत अमेरिकेला 131 टन, आखाती देशांत 42 टन, तर युरोपीय महासंघातील देशांत 18 टन आंब्याची निर्यात झाल्याचे येथे सांगण्यात आले. यंदा दक्षिण कोरिया, न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियाकडूनही आंब्याला मागणी येत असून, येत्या काळात या देशांत आंबा निर्यात केली जाणार आहे.

अमेरिकेची निर्यात वाढणार
गेल्या वर्षी अमेरिकेला 700 टन आंबा निर्यात करण्यात आला होता. यंदा यात किमान चाळीस टक्क्यांची वाढ अपेक्षित असून, निर्यातीचे प्रमाण 1200 टनांच्यापुढे जाण्याची अपेक्षा आहे. जपाननेही यंदा प्रथमच आंब्यासाठी मागणी नोदवली असून, गेल्याच आठवड्यात तीन टन आंबा जपानला निर्यात करण्यात आला आहे. जपानकडून मागणी वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

आवक वाढली
सध्या महाराष्ट्रासह कर्नाटकातील आंब्याची बाजारात मोठ्या प्रमाणात व समाधानकारक आवक सुरू आहे. पुढील महिनाभर ही आवक होत राहील. त्यानंतर उत्तर प्रदेशातील आंब्याची बाजारात आवक वाढेल. त्यामुळे निर्यातीचा कालावधीही वाढेल. गेल्या वर्षी 45730 टन आंबा निर्यात झाला होता. यंदा दर्जेदार फळ व भरघोस उत्पादनामुळे निर्यातीचे प्रमाण 50 हजार टनांच्या पुढे जाईल, असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे.