आंबेगावातील कालव्याला पाणी सोडा

0

शेतकर्‍यांची मागणी : पाण्याअभावी जनावरांचा चारा व पिके सुकली

आंबेगाव : आंबेगाव तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील लौकी गावासह परिसरातील दहा गावांना पाणीटंचाई जाणवू लागली आहे. जनावरांचा चारा व पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे डिंभे धरण कालवा सल्लागार समितीच्या पदाधिकार्‍यांनी लवकरात लवकर बैठक घेऊन घोड शाखा कालव्याला त्वरित पाणी सोडण्याची व्यवस्था करावी, मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे.

हुतात्मा बाबू गेनू जलाशय (डिंभे धरण) डाव्या कालव्याद्वारे जुन्नर तालुक्याला पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात आले आहे. पाणी कळंब-गणेशवाडी येथून घोड शाखा कालव्याद्वारे लौकी, थोरांदळे, जाधववाडी, रांजणी, नागापूर या गावांना सोडण्याची व्यवस्था आहे. या वर्षी पाऊस कमी झाल्याने जानेवारी महिन्यातच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. दहा गावांतील विहिरींची पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. ऊस, गहू, कांदा, मका, बटाटा आदी पिकांसह जनावरांचा चारा करपू लागल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.

पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावा

परिसरात होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करून पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावावा, अशी मागणी करण्यात आली आहे. लौकी परिसरातील तलावांमध्ये अल्प पाणीसाठा शिल्लक असल्याने ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात आलेल्या नळ योजना पाण्याअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. डाव्या कालव्यातून घोड शाखेला 100 क्युसेसने पाणी सोडावे, अशी मागणी सरपंच संदेश थोरात, उपसरपंच गजाबा थोरात, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष लक्ष्मण थोरात, शेतकरी संतोष थोरात, श्रीकांत थोरात, नवनाथ काळे यांनी केली आहे.