एकरी 10 ते 12 टन उसाचे उत्पन्न येत नसल्याने भांडवली खर्च भागवणे अशक्य
तात्काळ पंचनामे करून शेतकर्यांना दिलासा देण्याची मागणी
निरगुडसर : आंबेगाव तालुक्यात हुमणीच्या प्रादुर्भावाने हजारो एकर उसाचे क्षेत्र बाधीत झाले आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती त्यात हाता तोंडाशी आलेले पिक उध्वस्त झाल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. या नुकसान भरपाईबाबत, तात्काळ पंचनामे करून शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी शासनस्तरावर प्रस्ताव सादर करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
हे देखील वाचा
शेतकरी दुष्काळाच्या छायेत…
आंबेगाव तालुक्यात या वर्षी पुरेसा पाऊस न झाला नाही. तसेच, बदलत्या हवामानामुळे हजारो एकर उसाचे पिक हुमणीच्या प्रादुर्भावामुळे संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. दुष्काळाच्या छायेत असणारा आंबेगाव तालुक्यातील शेतकरी हाता तोंडाशी आलेले उसाचे क्षेत्र उध्वस्त होताना पाहून संपुर्ण कोसळला आहे. उसाला मिळणारा कमी भाव तसेच एकरी 10 ते 12 टन उसाचे उत्पन्न देखील निघत नसल्याने भांडवली खर्च भागवणे अशक्य असून शेतकर्यांवर मोठे आस्मानी संकट कोसळले आहे.
शिवसेनेकडून कृषिविभागाकडे पाठपुरावा…
यासंदर्भात शिवसेनेच्या वतीने हुमणीच्या प्रादुर्भावामुळे बाधीत झालेल्या उस पिकाचे तात्काळ पंचनामे करून शासन दरबारात प्रस्ताव सादर करून शेतकर्यांना दिलासा देण्यात यावा. भरीव आर्थिक नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी युवासेनेचे महाराष्ट्र राज्य विस्तारक सचिन बांगर यांनी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडे केली होती. याची दखल घेत शासकीय आदेशानुसार आंबेगाव तालुक्यात कृषी विभाग, महसुल विभाग व ग्रामविकास विभागाकडुन बाधीत क्षेत्राचे पंचनामे सुरू करण्यात आले आहे. जास्तीत जास्त शेतकर्यांनी संबंधित विभागाकडे अर्ज करून आपल्या बाधीत क्षेत्राचे पंचनामे करून घ्यावेत, असे आवाहन शेतकर्यांना करण्यात आले आहे.