आंबेगाव परिसरात बिबट्याला केले ‘जेरबंद’

0

पुणे : पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव परिसरामध्ये बिबट्याने गेल्या काही दिवसांपासून दहशत माजवली होती. आंबेगावच्या कळंब परिसरात पुन्हा एका बिबट्याला पकडण्यात ‘बिबट्या निवारण केंद्रा’ला यश आले आहे. बुधवारी देखील एका बिबट्याला पकडण्यात आले होते. हे दोन्ही बिबटे परिसरात वावरणाऱ्या मादीचे असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. याच परिसरातून दोन बिबटे जेरबंद केल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

आंबेगावच्या कळंब परिसरात राहणाऱ्या मारुती कहडणे यांच्या दोन दिवसांपूर्वी पाच शेळ्या ठार केल्या होत्या. त्यानंतर हे कुटुंब भीतीच्या वातावरणात वावरत होते. मात्र हे बिबटे जेरबंद केल्याने या कुटुंबानी समाधान व्यक्त केले आहे. बुधवारी कळंब परिसरातून दोन वर्षीय बिबट्याला पकडण्यात आले होते. त्यानंतर मध्यरात्री आणखी एक वर्षीय बिबट्याला पकडण्यात आले आहे. दोन्ही बिबटे एकाच मादीचे असून त्यांना एकाच ठिकाणाहून पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून मादीसह बिबट्याचा वावर वाढला होता. यामुळे परिसरातील नागरिक खूप घाबरलेले होते. सध्या ‘बिबट्या निवारण केंद्र’ मादीच्या शोधात आहे, त्यामुळे संबंधित बिबट्याला माणिकडोह येथे सोडण्यात आले आहे.