तीन तासांत होत्याचे नव्हते झाले; अनेक संसार बेचिराख
मार्केटयार्ड परिसरातील घटना : झोपड्या खाक, शेकडो कुटुंबे रस्त्यावर
पुणे : पुणे मार्केटयार्ड येथील आंबेडकरनगर झोपडपट्टीत शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत 10 पेक्षा जास्त घरे व 60 ते 70 झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश आले. या भीषण आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तर अनेक संसार बेचिराख झालेेत. अग्निशमन दलाला माहिती मिळताच, 15 बंब, तीन पाण्याचे टँकर आणि 10 खासगी पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले होते. झोपडपट्टीत आग असल्याने घटनास्थळी दोन जेसीबी आणि चार रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या मुख्य अग्निशमन अधिकार्यांसह वरिष्ठ अधिकारी आणि जवळपास 70 जवानांनी ही आग आटोक्यात आणली. या आगीने दिडशेपेक्षा अधिक कुटुंबे रस्त्यावर आली असून, या घटनेने एकच हाहाकार उडाला होता.
सिलिंडरच्या स्फोटांमुळे आग पसरली
आग कशी लागली याचा स्वतंत्र तपास करण्यात येणार असला तरी, हे दुर्देवी अग्नितांडव बराच वेळ सुरू होते. मोठ्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले. पाण्याची फवारणी उशिरापर्यंत सुरू होती. आंबेडकरनगर झोपडपट्टीत तीन ते चार सिलिंडरचा एकापाठोपाठ एक स्फोट झाल्याने आगीची तीव्रता वाढली. तथापि, ही आग का लागली याचे नेमके कारण कळू शकले नाही. आगीमध्ये कोणीही गंभीर जखमी किंवा जीवितहानी झाली नसली तरी आग विझविण्यासाठी गेलेला जवान काहीकाळ धुराने गुदमरला होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले.
काहीक्षणात बेचिराख झाली झोपडपट्टी
– सकाळी दहा वाजेच्या सुमारास आग भडकली
– तब्बल तीन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
– संसार जळून राख झाल्याने महिला धायमोकलून रडत होत्या
– आगीत अनेक कुटुंबाची भांडी, धान्य, पैसे, कपडे, बिछाना वस्तू जळाल्या
आखो देखा…
1. या आगीने भीषण स्वरुप धारण करण्यासाठी झोपड्यांतील फुटलेले गॅस सिलिंडर कारणीभूत ठरले. प्रसंगावधान राखून अन्य नागरिकांनी तातडीने आपले सिलिंडर बाहेर काढले व सुरक्षितस्थळी हलविले. त्यामुळे आणखी भीषणता रोखता आली.
2. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचण्यासाठी तब्बल अर्धातासाचा वेळ लागला. तोपर्यंत आग वार्याच्या वेगाने पसरली होती. चोहीकडे धूर आणि गोंधळाचे साम्राज्य पसरले होते.
3. घटनास्थळी गर्दी होऊ नये यासाठी आजूबाजूचे रस्ते पोलिसांनी बंद केले होते. तसेच, अग्निशमन बंब वेळेवर पोहोचण्यासाठी पोलिसांनी पराकोटीचे प्रयत्न केले. त्यामुळे मोठी जीवित व वित्तीय हानी टाळता आली.
4. विवाहासाठी आणलेले सामान, झोपडीतील किडूकमिडूक, पैसा, कपडेलत्ते सर्व खाक झाल्याने महिलांनी एकच आक्रोश केला होता. हा आक्रोश हृदयाला वेदना देणारा होता.
5. एका झोपडीतील पाळणा घरात काही लहान मुले होती. घाईगडबडीत एक तीन महिन्यांची चिमुकली झोपडीतच राहिली. सुदैवाने तिचे प्राण वाचविण्यात यश आले. तिच्यावर उपचार सुरु होते.
सरकारने घरे बांधून द्यावीत!
भीषण आगीत झोपड्या जळालेले नागरिक हे अत्यंत गरीब आहेत. मोलमजुरी करून ते उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या आयुष्याची पुंजीच जळाली आहे. तेव्हा राज्य सरकार व पुणे महापालिकेने या पीडितांना तातडीने घरे बांधून द्यावीत. त्यांना तातडीने आर्थिक सहाय्य करावे.
– अमोल तुजारे
अध्यक्ष रिपब्लिकन मातंग सेना