आंबेडकरांच्या अनुयायींना नक्षलवादी म्हणू नका-आठवले

0

पुणे-पुण्यात शनिवारवाड्यावर झालेली एल्गार परिषद ही आंबेडकरी जनेतेने आयोजित केली होती. त्यामुळे एल्गार परिषदेचा कोरेगाव भीमा येथील दंगलीशी संबंध नाही. या प्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी जर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी असतील तर त्यांना नक्षलवादी संबोधण्यात येऊ नये. या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे.

नक्षलवादी संघटनेशी संबंध नसेल तर मदत करेल

आंबेडकरांचे अनुयायी असलेल्या सर्व तरुणांना मी आवाहन करतो की, त्यांनी नक्षलवादी चळवळीशी संबंध असलेल्या संघटनांसोबत जाऊ नये. कोरेगाव भीमा प्रकरणात अटक करण्यात आलेल्या व्यक्तींचा नक्षलवादी चळवळीशी संबंध नसेल तर मी त्यांना मदत करण्याचा जरुर प्रयत्न करेन, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

१ जानेवारी २०१८ रोजी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीत नक्षलवाद्यांचा हात असल्याचा आरोप पुणे पोलिसांनी केला आहे. नक्षलवादी चळवळीशी संबंध असल्याचा दावा करीत ५ जणांना पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी अटक केली.

मिलिंद एकबोटे यांना वाचविण्याचा प्रयत्न

अटक करण्यात आलेल्यांपैकी दलित लेखक सुधीर ढवळे यांनी दंगलीपूर्वी दोन दिवस आगोदर पुण्यात शनिवारवाड्यावर एल्गार परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेच्या आयोजनासाठी नक्षलवाद्यांचा पैसा वापरण्यात आल्याचा दावाही पुणे पोलिसांनी केला असून याची चौकशी सुरु असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर या एल्गार परिषदेचा आणि दंगलीचा संबंध असेलच असे सांगता येत नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी प्रमुख आरोपी असलेल्या संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या बचावासाठीच नक्षलवादी ठरवत आंबेडकरी तरुणांना ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप एल्गार परिषदेच्या आयोजकांनी केला आहे.