आंबेडकरी विचारवंत अविनाश डोळस यांचे निधन

0

औरंगाबाद- ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत अविनाश डोळस यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले. औरंगाबाद येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. सकाळी अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले होते. आज दुपारी ४ वाजता त्यांच्या पार्थिवावर भीमनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयात ते मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. काही काळ त्यांनी या विभागाचे विभागप्रमुख म्हणूनही काम केले. आंबेडकरी विचारवंत आणि साहित्यिक म्हणूनही त्यांची विशेष ओळख होती. औरंगाबाद विद्यापीठाच्या नामांतर चळवळीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य आणि प्रकाशन समितीचे माजी सदस्य सचिव म्हणून ते काम करत होते. डोळस यांनी दलित व कष्टकरी वर्गाच्या हक्कांसाठी बरेच लिखाण केले. १९९० मध्ये नांदेड येथे झालेल्या अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. जानेवारी २०११ मध्ये चंद्रपूर येथील घुग्घुस येथे भरलेल्या १२व्या आंबेडकरी साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते. त्यांनी बरीच पुस्तकेही लिहीली. त्यात आधारस्तंभ : प्राचार्य ल.बा.रायमाने, आंबेडकरी चळवळ : परिवर्तनाचे संदर्भ, आंबेडकरी विचार आणि साहित्य, महासंगर हा कथासंग्रह आणि सम्यकदृष्टीतून या पुस्तकांचा समावेश आहे.