इगो हा सार्वत्रिक प्रॉब्लेम
’समतेचं तत्त्वच विषमतेच्या संसर्गापासून दूर नाही’ असं साम्यवादाचे कडवे भाष्यकार मांडत आले आहेत. समानतेत विषमता आहे की नाही, हा भाग वादाचा असेलही. मात्र, समतेचे तत्त्वज्ञान मांडणार्याच्यात मोठं विभाजन आहे, हे नक्की. म्हणजे ज्याच्या हातात रेणू असेल, तर ते त्याचा अणू करण्याएवढे विभाजनात माहिती आहेत. जे जे पुरोगामी, समानतावादी म्हणवतात त्यांचा स्वतःचा, त्यांच्या संघटनेचा आणि त्या दोघांचा मिळून इगोचा एक प्रॉब्लेम सार्वत्रिक आहे. समतेसाठी त्यातली दोन माणसं कधीही एकत्र येत नाही. आली तरी ती एका जागेवर कायम राहत नाहीत. भारतातला त्यांचा इतिहास मोठा आहे. तो लक्षात असूनही रिपब्लिकन पक्षाचं, म्हणजेच दलित समाजाचं प्रतिनिधित्व करणार्याच एकत्र येणं महत्त्वाचं असतानाही ते होत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या विशाल माणसाच्या नावावर तयार झालेला, दबलेल्या लोकांसाठीचा हा पक्ष अहंगंडाबाबतीत विशाल आणि लोकांच्या कल्याणाबाबतीत आखूडच राहिला आहे. ज्येष्ठ कविवर्य बा.भ. बोरकर यांनी आपल्या एका ललित लेख संग्रहात एक वाक्य लिहिलं आहे. ते असं आहे – ’जेव्हा एखाद्या स्थानावरून गुरू जातो. त्यावेळी तिथं गुरं हुंदडतात’ रिपब्लिकन पक्षातली फाटाफूट ही गुरांचं अस्तित्व स्पष्टपणे जाणवून देणारी होती. आज महापालिकेच्या निवडणुकात कोण आणि कसे हुंदडत आहेत, हे दिसतंच आहे.
नेते सत्तेच्या वळचणीला: महाराष्ट्रातील आंबेडकर चळवळीचं काय चाललंय आणि काय होणार आहे, याचा अंदाज आजपर्यंत कुणालाच घेता आलेला नाही. आंबेडकरी चळवळीतले नेते सत्तेच्या वळचणीला राहण्यात धन्यता मानणारे आहेत आणि सत्ता बदलली की, ते आपली दिशा बदलतात. सत्तेच्या तुकड्यासाठी लाचार बनून स्वाभिमान, आत्मसन्मान गहाण टाकतात.
आंबेडकरी चळवळ आताशी फोफावली आहे.आंबेडकरी विचारांची ही संकल्पना आता केवळ पूर्वाश्रमीच्या महार किंवा आताच्या बौद्ध समाजापुरती मर्यादित राहिलेली नाही. ही साधी गोष्टसुद्धा आंबेडकरी चळवळीतले नेते लक्षात घेताना दिसत नाहीत. गेल्या काही वर्षांत अनेक गावांतून सर्व जाती धर्माचे उत्सव गावाने एकत्रितपणे साजरा करण्यास सुरुवात झालीय. त्यात आंबेडकर जयंतीसुद्धा आहे. परंतु, अशी गावं फार थोडी आहेत. बाकी सगळीकडे आंबेडकर जयंती हा बौद्धांचा उत्सव म्हणूनच मर्यादित राहिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या नेत्याला ज्याने देशाला संविधान दिलं, त्यांनाही आपण संपूर्ण समाजाचे करू शकलेलो नाही. हा दोष दलितेतर समाजाकडे जसा जातो तसाच तो आंबेडकरांना जातीच्या चौकटीत बंद करणार्या समाजाकडेही जातो.
बाबासाहेबांचे अनुयायी कोण? : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी म्हणजे नक्की कोण, असा प्रश्न उपस्थित केला, तर त्याचं नेमकं उत्तर काय देता येईल? खरोखरंच कुणाला म्हणायचं आंबेडकरांचे अनुयायी? जे जयंतीच्या मिरवणुकीत सामील होतात ते सारे अनुयायी असतात का? किंवा त्यातल्याही लोकांची त्यांच्या त्यांच्या विशेषत्वानुसार विभागणी करूनही विचार करता येतो. प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, राजा ढाले, अर्जुन डांगळे, राजेंद्र गवई आदी जे महाराष्ट्रातील दलित चळवळीचे नेते आहेत, त्यांना बाबासाहेबांचे अनुयायी म्हणता येईल का? उत्तर प्रदेशसारख्या राज्यात बाबासाहेबांचे विचार रुजवणारे आणि त्या बळावर राज्यातील सत्ता मिळवणारे दिवंगत कांशीराम आणि बसपच्या अध्यक्षा मायावती यांना बाबासाहेबांचे अनुयायी म्हणता येईल का? डॉ. नरेंद्र जाधव किंवा डॉ.भालचंद्र मुणगेकर यांना बाबासाहेबांचे अनुयायी म्हणता येईल का? पुतळा विटंबनेनंतर काचा फोडणार्यांना बस, रेल्वेची जाळपोळ करणार्यांना अनुयायी म्हणायचं का? की बाबासाहेबांच्या वैचारिक भूमिकेशी एकरूप होऊन त्यांना अनुसरून वाटचाल करणार्यांना अनुयायी म्हणायचं? इथे उल्लेेख केलेले सारेचजण स्वतःला बाबासाहेबांचे अनुयायी म्हणवून घेतात. जीवनाच्या अखेरच्या काळात शिवसेनेच्या छावणीत गेलेले नामदेव ढसाळही बाबासाहेबांना उद्देशून, ’तुझं बोट धरून चालतो आहे’ असं म्हणत होते. यातल्या कितीजणांना सच्चे अनुयायी म्हणता येईल?
आठवले तिष्ठत राहिले: बहुतेक आंबेडकरी नेत्यांनी जातीयवाद्यांशी घरोबा केल्यानंतरही धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत राहिलेले रामदास आठवले शेवटी शिवसेनेसोबत गेले आणि शिवसेना भाजप युतीची फाटाफूट झाली, तेव्हा त्यांनी भाजपची सोबत पसंत केली. राज्यात सत्ता नाही मिळाली, तरी केंद्रात भाजपची सत्ता आहे, केंद्रात मंत्रिपद देण्याचं आश्वासन त्यांना भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी दिलं होतं. त्या आशेवर ते भाजपसोबत गेले. मध्य प्रदेशच्या कोट्यातून ते राज्यसभेवर गेले आणि मोठ्या प्रतीक्षेनंतर भाजपनं त्यांना मंत्रिपद दिलं. सत्तेसाठी लाज सोडून काहीही तडजोड केल्यानंतर अशीच वेळ येते, हा धडा खरं तर, बाकीच्या दलित नेत्यांनीही घ्यावयास हवा.
आंबेडकरांचे ब्रॅण्डनेम: प्रकाश आंबेडकरांकडे ’आंबेडकर’ हे ब्रॅण्डनेम आहे त्यांची प्रारंभीच्या काळातली राजकीय वाटचाल संशयास्पद होती. परंतु, अलीकडच्या काळात त्यांना वस्तुस्थितीचं नेमकं आकलन झालं असल्याचं दिसून येतं. मात्र, नेतृत्व करायचं तर अहंकार बाजूला ठेवून सगळ्यांना सोबत घेण्याची तयारी लागते.एकट्यानं लढण्याऐवजी अनेकांची साथ असेल, तर लढाई अधिक जोमाने लढता येते, हा धडा प्रकाश आंबेडकरांना ठाऊक आहे, पण अद्यापि गिरवलेला नाही.
व्यापक भूमिका हवी : जोगेंद्र कवाडे यांनाही धर्मनिरपेक्ष भूमिकेतील सातत्य टिकवता आलेलं नाही. या सगळ्या नेत्यांनी सत्तेसाठी तडजोडी स्वीकारल्या. परंतु, त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे आंबेडकरी चळवळ जातीच्या चौकटीत बंदिस्त केली. रिपब्लिकन पक्षाला अन्य समाजघटकामध्ये स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. प्रकाश आंबेडकरांनी केलेला ’भारिप-बहुजन महासंघ’चा प्रयोग हा राज्यातील एक वेगळा प्रयोग होता.परंतु, तो अधिक व्यापक बनू शकला नाही. खरं तर अशाच प्रकारचा पर्याय नव्याने उभा करण्यासाठी प्रयत्न करावयास हवेत. मराठा, ओबीसी घटकांना जोडून घेऊन आंबेडकरी समाजाने व्यापक धर्मनिरपेक्ष आघाडी उभी करायला पाहिजे. नेत्यांनी अहंकार बाजूला ठेवून प्रयत्न करायला हवेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर(125) रौप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात असा काही वेगळा प्रयोग झाला, तर तो देशाच्या पातळीवर दिशादर्शक ठरू शकेल. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे हिंदुत्ववाद्यांच्या उन्मादी राजकारणाला त्याद्वारे चोख उत्तर देता येईल. भारतीय संविधानावर आलेलं संकट परतून लावता येईल.
सच्चा नेता मिळाला नाही : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आजही लाखो लोकांना प्राणांहून प्रिय आहेत, अशा बाबासाहेबांचं नाव घेऊन त्यांना काही स्वार्थ साधायचा नसतो. संघटना चालवायची नसते की राजकारण करायचं नसतं. ज्या महामानवानं आपल्याला माणूस म्हणून जगायला शिकवलं, गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर काढलं, त्यांना अभिवादन करण्यासाठी, त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता लाखो लोकांची गर्दी दीक्षाभूमीवर किंवा चैत्यभूमीवर उसळते. रापलेल्या चेहर्याची, डोळे पैलतीरीला लागलेली ही माणसं ज्या निष्ठेनं आलेली असतात तेवढीच निष्ठा नव्या पिढीच्या ठायीही दिसते. शाळकरी मुलांपासून कॉलेजच्या तरुण-तरुणींपर्यंत सारे वयोगट असतात. कोणत्याही अपेक्षा न ठेवता येणार्या यास गर्दीला बाबासाहेबांच्यानंतर त्यांच्या विचारधारेचा एकही सच्चा नेता मिळू नये, ही खरं तर शोकांतिकाच!
पक्षाचं अस्तित्व अडचणीत : आज संविधानासमोर धोका निर्माण झाला असताना आंबेडकर चळवळीने त्याविरोधात तीव्र संघर्षाला सज्ज होण्याची गरज असताना ’आंबेडकरी’ म्हणवून घेणारे नेते मात्र संविधानाच्या मारेकर्यांच्याच कळपात अधिक संख्येने सामील झालेले दिसावेत, ही चळवळीची शोकांतिका आहे. पुण्यामुंबईत रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते सेना-भाजपच्या चिन्हावर निवडणुका लढले आणि पक्षाचं अस्तित्व संपवायला हातभार लावला. खरंतर आंबेडकरी विचार हा देशाचा श्वास आहे. तो श्वासच आता कोंडला जातो आहे. त्याने आंबेडकरी विचार, चळवळ आणि लोक गुदमरू लागले आहेत. त्यांची घुसमट होऊ लागली आहे. संविधानाचा श्वास मोकळा व्हायला हवाय. आंबेडकरी जनता त्याची वाट पाहतेय.
हरीश केंची- 9422310609