आंबेडकर यांचे ऐरोलीत उभे राहणारे स्मारक नवी मुंबई शहराचा नावलौकिक जगभरात वाढवणारे ठरेल

0

नवी मुंबई । महानगरपालिका वॉटर, गटर, मीटर सारख्या नागरी सुविधा दर्जेदार रीतीने पुरवतेच, पण त्याच्या पलीकडे जात समाजाला दिशा देणारे आदर्शवत प्रकल्पही उभारत असून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऐरोलीत उभे राहणारे भव्यतम स्मारक नवी मुंबई शहराचा नावलौकिक जगभरात वाढवणारे ठरेल, असा विश्‍वास व्यक्त करत नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी बाबासाहेबांच्या स्मृतींना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभागाच्या वतीने ऐरोलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील सभागृहात 127 व्या जयंती दिनाचे औचित्य साधून संपन्न झालेल्या सामाजिक समता सप्ताह समारोपप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करत होते. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना आमदार संदीप नाईक यांनी स्मारकाच्या पहिल्या टप्प्याच्या शुभारंभानंतर पहिलाच कार्यक्रम याठिकाणी होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करीत बाबासाहेबांच्या सामाजिक समतेच्या विचारांची गरज सांगून विशेषत्वाने नव्या पिढीच्या मनात बाबासाहेबांचे विचार रुजवण्याची गरज विशद केली.

या स्मारकामध्ये निर्माण होत असलेल्या ग्रंथालयात बाबासाहेबांवरील सर्व प्रकारच्या ग्रंथसंपदेचा समावेश असावा असे सांगत या ग्रंथालयाची किर्ती सर्व अभ्यासकांपर्यंत पोहोचेल, अशी निर्मिती करावी असे मत व्यक्त केले. आमदार मंदाताई म्हात्रे यांनी बाबासाहेबांच्या समतेच्या विचारांचे आम्ही अनुयायी आहोत असे सांगत बाबासाहेबांनी स्त्री सक्षमीकरणासाठी घटनेत ज्या तरतुदी केल्या. त्यामुळेच महिलांच्या सर्वांगीण विकासाला गती मिळाली असे सांगितले. बाबासाहेबांचे देशाच्या विकासात प्रत्येक क्षेत्रात योगदान असल्याचा उल्लेख करत नदी जोड प्रकल्पाचे उदाहरण देत त्यांनी बाबासाहेबांच्या दूरदृष्टीबद्दल विचार मांडले. यावेळी बोलताना महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक हे समाजासाठी प्रेरणादायी असेल ही भूमिका नजरेसमोर ठेवूनच याची उभारणी केली जात असल्याचे सांगत येथील प्रत्येक गोष्ट उत्तमच असेल असे विश्‍वासपूर्वक सांगितले. बाबासाहेबांचे सामाजिक समतेचे विचार पुढे नेण्याची गरज असून यादृष्टीने आजच्या 127 व्या जयंतीदिनी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे सांगत याठिकाणी युवा वर्गाची मोठी उपस्थिती असल्याबद्दल समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समिती सभापती अनिता मानवतकर यांनी समाधान व्यक्त केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीदिनाचे औचित्य साधून सुरू करण्यात आलेल्या विविध शैक्षणिक, कला, क्रीडा विशेष शिष्यवृत्तीचे प्रत्येकी 51 हजार रुपये प्रमाणे 55 लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात भारताचे संविधानातील प्रस्ताविका वाचनाने झाली तसेच पोलीस बँड पथकाने वंदे मातरम् गीताने मानवंदना दिली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित बार्टी, पुणे निर्मित चित्रफीत प्रदर्शित करण्यात आली तसेच बार्टीच्या कलावंतांनी ’महाडचा मुक्तीसंग्राम’ हे पथनाट्य सांदर केले. परशुराम कोळी आणि सहकारी यांनी सादर केलेल्या भीमगीतांच्या कार्यक्रमालाही उपस्थितांनी कौतुकाची दाद दिली.