मुंबई-इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भव्य स्मारकाचे काम प्रगतीपथावर असून ते दि. 14 एप्रिल 2020 पर्यंत पूर्ण होणार असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले. इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करुन संबंधित अधिकाऱ्यांकडून बांधकामाचा आढावा घेतला, त्यावेळी श्री.बडोले बोलत होते.
यावेळी बडोले म्हणाले, इंदू मिलच्या संपूर्ण जमिनीचे हस्तांतरण पूर्ण झाले आहे. स्मारकाच्या उभारणीसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन मे. शापूर्जी पालनजी कंपनीला काम मिळाले आहे. बांधकामाला प्रत्यक्ष सुरूवातही झालेली आहे. इंदू मिलच्या जागेवरील इमारतीचे जुने बांधकाम पाडण्याचे काम पूर्ण केले असून कामाच्या ठिकाणी बोअर होल्स घेण्याचे काम प्रगतीपथावर आहे. कामातील संशोधन केंद्राच्या खोदकामास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 134 शोअर पाईल्सचे काम पूर्ण झालेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरां यांच्या स्मारकाचे काम नियोजित वेळेतच उभे करायचे आहे. स्मारकाचे काम जलद गतीने पूर्ण होईल, या कामासाठी निधी कमी पडणार नसल्याचे यावेळी श्री.बडोले यांनी सांगितले. यावेळी एमएमआरडीएचे मुख्य अभियंता आर. जे. गाडगे, वास्तू विशारद तथा प्रकल्प सल्लागार शशी प्रभू, क्षेत्र नियोजन विभागाचे संमत कुमार, अधीक्षक अभियंता ए. पी. नागरगोजे आदी अधिकारी उपस्थित होते.