आंबोली । प्रति महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणार्या आंबोलीधबधबा रविवारी पर्यटकांनी फुलला होता. श्रावण महिन्याला लवकर सुरुवात होणार आहे. त्यामुळे रविवारी आंबोली धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी दिसली. अनेक पर्यटकांनी सहलीचा बेत आंबोली धबधब्याजवळ आखला होता. आंबोली धबधब्याकडे निसर्गरम्य ठिकाण म्हणून पर्यटकांची पसंती जास्त असते. आंबोली येथे वर्षा पर्यटन हंगामाच्या पहिल्याच रविवारी गर्दी काहीशी कमी राहिली. मात्र, त्यानंतर पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर पर्यटकांची संख्येत वाढ झाली. रविवारीही ही गर्दी कायम दिसली. पर्यटकांची संख्या हजारोंच्या घरात होती.
…म्हणून वाढली गर्दी
दरवर्षीपेक्षा यंदा येथील घाटातील मुख्य धबधबा लवकर प्रवाहित झाला. मात्र, त्यानंतर पावसाने काहीअंशी विश्रांती घेतल्याने मुख्य धबधब्याला पाण्याचा प्रवाह कमी होता. पाऊस कमी असल्याने येथील इतर धबधबेही फेसाळून वाहत नव्हते. मात्र, पावसाची कधी संतत धार तर, कधी धो-धो पडणारा पाऊस यामुळे येथील धबधब्यांचा प्रवाह वाढला. त्यामुळे रविवारी हजारो पर्यटकांनी येथे एकच गर्दी केली.
‘झेनिथ’नेही घातली भुरळ
पावसाळ्यात नेहमीच पर्यटकांची झेनिथ धबधब्यावर गर्दी पाहायला मिळते. तब्बल 80 मीटर उंच अशी सरळ दगडी भिंत, त्यावरून कोसळणारा धबधबा हे स्वर्गीय सौंदर्य बघायला पर्यटकांचीही गर्दी उसळत असते. डोंगर माथ्यावरून उड्या मारत अवखळ ओढा वाहू लागतो. हाच ओढा महाकाय धबधब्याचे रूप धारण करतो. येथे येणारा प्रत्येक पर्यटक हा धबधब्याखाली मनसोक्त भिजतो. कोसळणार्या धबधब्याचे तुषार उडवत पर्यटक न्हाऊन निघत असतात. याचसोबत आपला वीकएंड ओलाचिंब करण्यासाठी पर्यटक, कुटुंब आणि प्रेमीयुगुल या धबधब्याखाली मुक्तपणे भिजून घेण्याचे साहसही करतात. तसेच या धबधब्यावरून डोंगर माथ्यावरील इतरही धबधबे दृष्टीसही पडतात.
हॉटेल होते हाऊसफुल्ल
कावळेसाद तसेच महादेवगड पॉईंट्स येथील खोल निसर्ग सुंदर दर्या व या दर्यांमधे कोसळणार्या पाण्याचे वार्याच्या झोतासोबत येवून अंगावर पडणारे फवारे, सोबत मुख्य धबधबा तसेच इतर धबधब्यांवर भिजण्याचा मनमुराद आस्वाद येथे आलेल्या पर्यटकांना घेता आला. रविवारी झालेल्या या गर्दीमुळे येथील हॉटेल्स सर्व हाऊसफुल्ल व आलेल्या हजारो पर्यटकांमुळे व्यावसायिकही खूश झाले आहेत. तसेच मुख्य धबधब्या सोबत सर्वच पॉईंट्सवर पोलिसांचा चोख बंदोबस्त
केल्याने कोणतेही अनुचित प्रकार घडले नाहीत. कौटुंबिक पर्यटक बर्यापैकी होते.