जळगाव। कैरी तोडण्यासाठी झाडावर चढलेल्या बालकाचा खाली पडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी जामनेर तालुक्यातील मांडवेदिगर येथे घडली. सियाराम बारेला हे मांडवेदिगर येथे पद्म नामक इसमाकडे गेल्या दहा वर्षांपासून सालदार म्हणून कामाला आहेत. शनिवारी सियाराम यांच्या मुलगा गुरूलाल सियाराम बारेला हा बालक 3 ते 4 जणांसह बकर्या चारण्यासाठी गेला होता.
बकर्या चारत असतांना त्यांना आंब्याचे झाड दिसले. त्यावर लागलेल्या कैर्यां पाहताच त्यांना खाण्याचा मोह झाला. त्यामुळे गुरूलाल हा बकर्यांसाठी झाडाची पाने तोडण्यासाठी व स्वत:साठी कैरी तोडण्यासाठी तो झाडावर चढला. मात्र, त्याचा तोल जावून तो खाली पडला. डोक्याला जबर मार बसल्याने त्याला जामनेर येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथून शासकिय रूग्णवाहिकेने त्यास जिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले.