बगदाद । इराकची राजधानी बगदात पुन्हा एकदा हादरून गेली. एका आइस्क्रीम दुकानाला लक्ष्य करत एका कारमध्ये हा बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला. या बॉम्बस्फोटात 10 जण ठार, तर 22 जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काहींची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. सोमवारी रात्री उशीरा हा बॉम्बस्फोट घडविण्यात आला. सध्या जगभरात मुस्लिम बांधव रमझानचा महिना साजरा करत आहेत. त्यामुळे जगभरातील बहुतांश बाजारपेठा दिवसभर शांत तर, संध्याकाळी गर्दीने भरून जातात. त्यामुळे वाढलेली गर्दी विचारात घेऊन मोठा घातपात घडवण्याच्या उद्देशानेच रात्रीच्या वेळी हा बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्विकारली नाही. या आधीही बगदादमध्ये बॉम्बस्फोट झाले होते. मात्र, त्यावेळी झालेल्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी आयसिसने स्वीकारली होती. या वेळीही जबाबदारी स्वीकारली नसली तरी, हे बॉम्बस्फोट आयसिसनेच घडवले असावेत असा संशय व्यक्त केला जात आहे. गेल्या वर्षी रमझानच्याच महिन्यात ट्रक बॉम्ब हल्ला करण्यात आला होता. त्या हल्ल्यात 100 जणांना आपले प्राण गमावले होते. यावर्षीही त्याचीच पुनरावृत्ती घडली आहे.