घर हडपण्यासाठी मारहाण करुन मुलाकडून धमकी ; प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांनी दिला निर्णय
जळगाव – आई माझा गुरु, आई कल्पतरू, सुखाचा सागरू आई माझी… अशी आईची महती व्यक्त करणारी कविता आपण सर्वांनीच ऐकली आहे. एकीकडे ही महती आणि दुसरीकडे आई-वडीलांचा मानसिक, शारिरीक छळ करणार्या मुलांचीही कमतरता नसल्याची घटना जळगावातील निकालाने समोर आली आहे. घराचा ताबा मिळावा यासाठी जन्मदात्या आईचाच छळ करणार्या मुलाला घरात प्रवेशबंदी करण्याचा ऐतिहासिक निर्णय जळगावच्या प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांनी गुरूवारी दिला. तसेच यासोबतच छळ करणार्या मुलासह इतर दोन मुलांना आईला प्रत्येकी 2500 रूपये निर्वाह भत्ता देण्याचेही आदेश दिले.
स्वकमाईतुन बांधले होते दोन मजली घर
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सुमन आनंदा पाटील (वय 75, रा. गणेशवाडी, जळगाव) यांना दिलीप आनंदा पाटील, रमेश आनंदा पाटील, किशोर आनंदा पाटील आणि दोन मुली अशी अपत्ये आहेत. श्रीमती सुमन पाटील यांचे पती आनंदराव रामजी पाटील हे मजुरी काम करीत होते. तर सुमन पाटील ह्या शिवणकाम करून घराचा उदरनिर्वाह भागवित होते. मुलाबाळांना शिकवुन मोठे करण्याचे कर्तव्य पार पाडत असतांनाचा सन 2009 मध्ये आनंदराव पाटील यांचे निधन झाले. त्यामुळे घराची सर्व जबाबदारी आई सुमन पाटील यांच्यावर आली. स्वकमाईतुन सुमन पाटील यांनी दोन मजली पक्के घर बांधले. सुमन पाटील यांचे दिलीप व रमेश पाटील ही दोन मुले लग्नानंतर विभक्त होऊन संसाराला लागले.
घर मिळावे म्हणून मारहाण करून धमक्याही
त्यानंतर तिसरा मुलगा किशोर आनंदा पाटील हा आईमध्येच राहत होता. किशोर पाटील याने लग्न झाल्यानंतर घर नावावर करावे म्हणून आई सुमन यांचा मानसिक, शारिरीक छळ करण्याला सुरवात केली. मारहाण करून धमक्याही दिल्या. यासंदर्भात सुमन पाटील यांनी दि. 1 डिसेंबर 2016 व 6 जानेवारी 2017 रोजी औद्योगिक वसाहत पोलीस निरीक्षकांकडे तक्रार अर्ज दिला. तसेच अॅड. बिपीन पाटील यांच्यामार्फत नोटीसही देण्यात आली. मात्र ही नोटीस किशोर पाटील यांनी स्विकारली नाही. त्यानंतर न्यायालयातही सुमन पाटील यांनी दावा दाखल केला. तसेच उपविभागीय अधिकारी दीपमाला चौरे यांच्याकडेही सुमन पाटील यांनी तक्रार अर्ज केला.
अन् ऐतिहासिक निर्णय दिला
पीठासीन अधिकारी म्हणून दीपमाला चौरे यांनी सुनावणी घेऊन तीनही मुलांना खुलासा सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार दिलीप पाटील व रमेश पाटील यांनी घर कुणाला द्यावे याचा सर्वस्वी निर्णय आईने घ्यावा असा लेखी व तोंडी खुलासा दिला. किशोर पाटील यांनी मात्र तसा कुठलाही खुलासा दिला नाही. अखेर पीठासीन अधिकारी दीपमाला चौरे यांनी आई-वडील व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह कल्याण अधिनियम 2007 नुसार निर्वाह अर्जाचे कलम 2 (एफ), कलम 4,5,23 मधील तरतुदीनुसार तिसरा मुलगा किशोर आनंदा पाटील याला घरात प्रवेशबंदी करण्याचा निर्णय दिला आहे. तसेच छळ करणार्या किशोर पाटील याच्यासह इतर दोनही मुलांना आईला निर्वाह भत्ता म्हणून प्रत्येकी 2500 रूपये असे एकुण 7500 रूपये निर्वाह भत्ता देण्याचेही आदेश प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांनी दिले आहे.