डॉ. टेसी थॉमस : ‘कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे महिला संशोधन राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान
पुणे : शिक्षण हे आयुष्यात अत्यंत महत्त्वाचे असून सतत शिकत राहायचे ही आईची शिकवण आणि एका यशानंतर आता पुढे काय, याचा सतत ध्यास घ्यायचा असे प्रोत्साहन देणारे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी. जे. अब्दुल कलाम या दोन व्यक्तींनी माझे आयुष्य खर्या अर्थाने घडवले, असे मत बंगळुरू येथील क्षेपणास्त्र वैज्ञानिक डॉ. टेसी थॉमस यांनी व्यक्त केले.
कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा ‘कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे महिला संशोधन राष्ट्रीय पुरस्कार’ यंदा बंगळूरू येथील क्षेपणास्त्र वैज्ञानिक आणि भारताच्या अग्नीपुत्री (मिसाईल वुमन ऑफ इंडिया) डॉ. टेसी थॉमस यांना तर ‘कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे महिला साहस राष्ट्रीय पुरस्कार’ आर्टिस्ट्रीच्या वीणा गोखले आणि जागृती सेवा संस्थेच्या मंगला पाटील यांना विभागून देण्यात आला. प्रत्येकी दोन लाख रुपये आणि मानपत्र असे या दोन्ही पुरस्कारांचे तर प्रत्येकी पंचवीस हजार रुपये आणि मानपत्र असे ‘आदर्श सहचारिणी’ पुरस्कारांचे स्वरूप होते. सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, महापौर मुक्ता टिळक, सुरेश रानडे, तसेच ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. माशेलकर यांच्या पत्नी वैशाली माशेलकर, सिंबायोसिसचे डॉ. मुजुमदार यांच्या पत्नी संजीवनी मुजुमदार आणि ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या पत्नी अनुराधा पवार उपस्थित होते.
अग्नी-4 क्षेपणास्त्र प्रकल्पातील अनुभव
डॉ. टेसी थॉमस म्हणाल्या, तुमच्या पालकांच्या दृष्टिकोनाचा तुमच्या जडणघडणीवर खूप परिणाम होत असतो. तुमचे कुटुंब गरिब आहे की, श्रीमंत याहीपेक्षा तुमचे कुटुंब शिक्षित आणि ध्येयवादी आहे का हे अधिक महत्त्वाचे असते. लहानपाणापासून मला गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये रूची होती. त्याच्या जोरावर मी विज्ञान क्षेत्रात उच्च शिक्षण घेतले. एमटेक केल्यानंतर आयुष्यात आलेल्या प्रत्येक संधीसाठी मी पुरेपूर प्रयत्न केले, असे सांगून त्यांनी अग्नी-4 क्षेपणास्त्र प्रकल्पातील अनुभव विशद केले.
आपले दान सत्पात्री ठरावे
श्रीनिवास पाटील म्हणाले, समाजाच्या अनेक क्षेत्रातील व्यक्तींना मदतीची गरज असते. अनेक व्यक्ती आणि संस्था त्यांच्यासाठी काम करतात. आपण प्रत्यक्षपणे काम करू शकत नसलो, तरी अशा व्यक्ती आणि संस्थांना जमेल ती मदत करणे आपले कर्तव्य आहे. आपले दान सत्पात्री ठरावे, अशी प्रत्येकाची भावना असते.