आकुर्डीत सुबोध व्याख्यानमालेत ‘आई वात्सल्याचा झरा’ विषयावर अंतिम पुष्प
व्याख्याते भाऊसाहेब कोकाटे यांचे आवाहन
पिंपरी-चिंचवड : जन्म आणि मृत्यू यामधले जगणे सुखाचे व्हावे असे वाटत असेल तर आईचे संस्कार आयुष्यभर जपा! असे प्रतिपादन व्याख्याते भाऊसाहेब कोकाटे यांनी केले. श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट व आकुर्डी ग्रामस्थप्रणित आणि पिंपरी-चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समिती आयोजित तीन दिवसीय सुबोध व्याख्यानमालेत ‘आई वात्सल्याचा झरा’ या विषयावरील अंतिम पुष्प गुंफताना ते बोलत होते. विलास पाटील अध्यक्षस्थानी होते; तसेच प्रभाकर पवार, गोविंद काळभोर, निखिल शिंदे, मुख्य संयोजक शंकर काळभोर यांची प्रमुख उपस्थिती होती.
संस्कार वारसाची बँक म्हणजे आई
कोकाटे म्हणाले, या जगात संस्कारांचा वारसा आपल्या मुलांना कायम देणारी एकमेव बँक म्हणजे आई असते, म्हणून ज्याच्या घरात आई-वडील आहेत, तोच खरा श्रीमंत माणूस असतो. यशाच्या उत्तुंग शिखरावर विराजमान असलेल्या माणसाची आई जर वृद्धाश्रमात असेल तर त्याच्या यशाला लौकिकार्थाने काहीच किंमत नसते. छत्रपती शिवराय हे लहानपणी घोडेस्वारी करताना खाली पडले. जिजाऊ माँसाहेब समोरच होत्या; पण त्यांनी शिवबांना उचलून घेतले नाही. शिवबा रडवेले होऊन जिजाऊंना म्हणाले की, माँसाहेब, आपण आम्हाला उचलून का नाही घेतले? तेव्हा जिजाऊ म्हणाल्या, शिवबा, प्रत्येक ठिकाणी खाली पडल्यावर तुम्हाला उचलून घ्यायला आम्ही असणार नाही म्हणून तुम्ही स्वतःला सावरायला हवे! अशा छोट्या छोट्या प्रसंगांमधून शिवराय घडले.
आई नसेल तर सुख व्यर्थ
छोटा श्याम अंघोळीनंतर आईला म्हणाला, तुझ्या पदराने माझे पाय पूस, नाहीतर माझ्या तळपायाला माती लागेल! तो असे म्हणाल्यावर श्यामची आई म्हणाली, बाळा, तळपायाला माती लागू नये म्हणून इतका जपतोस, तसेच मनाला माती लागू नये म्हणूनही जप! या शिकवणीचा श्यामच्या मनावर सखोल परिणाम झाला आणि त्यातूनच सुसंस्कारित सानेगुरुजी घडले. अशा श्यामच्या आईची आज समाजाला गरज आहे. संस्कारांचे बाळकडू आपल्या बाळाला देणारी आई जर संस्कारित नसेल तर समाजाची अधोगती होते. कोणतीही स्त्री ही तीन वेळा जन्म घेते. पहिल्यांदा आईच्या कुशीतून, दुसर्या वेळी लग्न होऊन पतीकडे आल्यावर आणि सगळ्यात शेवटी ती स्वतः जेव्हा आई होते, तेव्हा तिचा पुनर्जन्म होत असतो, म्हणून घरात भौतिक सुखसोयी सर्व आहेत; पण आईच नसेल तर ते सुख व्यर्थ होय.
संस्कार ही मौल्यवान संपत्ती
आईचे संस्कार ही सर्वांत मौल्यवान संपत्ती असते. काबाडकष्ट करून आई-वडील आपल्या मुलांना मोठे करतात, त्यांना सक्षम बनवतात; पण हीच मुले पैसा कमावण्याच्या नादात आई-वडिलांना विसरतात तेव्हा त्या कुटुंबासारखे दुर्दैवी कोणीही नसते. कर्तबगार मुलांच्या कर्तृत्वाचे कौतुक करण्यासाठी आईचाच हात मुलाच्या पाठीवर हवा. आता समाजवास्तव बदलत चालले आहे. घरात सर्व असते; पण आई मात्र वृद्धाश्रमात असते. त्यामुळे एकवेळ मुले पैशांनी श्रीमंत झाली नाही तरी चालेल; पण ती संस्कारसंपन्न पाहिजेत. जगातले सर्व गुन्हे माफ करणारे न्यायालय म्हणजेच आई! तिची अडचण वाटून जरी तिला वृद्धाश्रमात ठेवले तरीही ती मुलांची आणि नातवंडांची आठवण काढत असते. आज जर श्यामची आई घराघरात निर्माण झाली तर ’निर्भया’ घडणार नाहीत! सुभाष पागळे यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.