गेंदालाल मिलमधील घटना ; बंद घराचे कुलूप तोडून मयत आईचेच 30 हजाराचे चांदीचे दागिण्यासह 1 हजार रुपयांची रोकडही लांबविली ; तीन ते चार दिवसांनी घरी परतल्यावर प्रकार उघड
जळगाव- हृदयाविकाराच्या झटक्याने अंत्यवस्थ वृध्द आईला रुग्णालयात हलवित असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. यानंतर तांबापुरा येथील भावाकडे दफनविधीचा कार्यक्रम आटोपून सात ते आठ दिवसांनी घरी परतलेल्या कुटुंबियांच्या चोरी झाल्याचा प्रकार 17 रोजी गेंदालाल मिलमध्ये समोर आला आहे. बंद घर फोडून चोरट्यांनी कपाटातील तिजोरीतील मयत आईचेच 30 हजार किमतीचे चांदीचे दागिणे तसेच हजार रुपयांची रोकड लांबविली. आई गमावली, मात्र तिचे आठवणीसाठी दागिणे शोधून मिळावे, अशी याचना फिरोज हाजी युनूस खाटीक रा. गेेंदालाल मिल या रिक्षाचालक मुलाने शहर पोलीस कर्मचार्यांकडे केली आहे.
शहरातील आव्हाणे रोड परिसर गेंदालाल मिलमध्ये बिल्डींग नं 56 येथे फिरोज हाजी युनूस खाटीक वय 44 हे राहतात. पत्नी नाझिया बी, दोन मुले व मुलगी, आई याच्यासह वास्तव्यास आहे. प्रवासी वाहतूक रिक्षाचालवून ते उदरनिर्वाह करतात.
10 एप्रिलला आईचा हृद्यविकाराने मृत्यू
फिरोज यांची आई रहिसा बी युनसू खाटीस वय 63 यांना 10 रोजी सायंकाळी 7.30 वाजता अचानक हृदयविकाराचा झटका आला. यानंतर फिरोज यांनी तत्काळ रिक्षातून त्यांना इंडोअमेरीकन हॉस्पिटलकडे हलविले. रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच आईचा मृत्यू झाला होता. यानंतर फिरोज यांनी त्यांचे तांबापुरा येथील भाऊ अशफाक व मुस्ताक यांना घटना कळविली. तिघांनी मृतदेह तांबापुरा येथे हलविला. याठिकाणी सर्व नातेवाईकांना घटना कळविण्यात आली. 11 रोजी सकाळी 9 वाजता अजिंठा चौक परिसरात कब्रस्थानमध्ये दफनविधी करण्यात आला. सर्व नातेवाईक असल्याने फिरोज व त्यांचे कुटूंबिय भावाच्या घरी राहिले.
17 रोजी घरी परतल्यावर चोरीचा प्रकार उघड
फिरोज खाटीक व त्यांचे सर्व कुटुंबिय गेंदालाल मिलमधील घराला कुलूप लावून तांबापुरा येथे गेले होते. दफनविधी सह इतर कार्यक्रम तसेच नातेवाईकांच्या भेटी झाल्यानंतर 17 रोजी कुटुंबिय पुन्हा गेंदालाल मिलमध्ये परतले. घरात प्रवेश करतेवेळी दरवाजाला तुटलेले कुलूप दिसले. यानंतर घरात प्रवेश केल्यावर त्यांना कपाटातील तिजोरी उघडी दिसली. तिजोरीत मयत आईचे 40 भार 30 हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिणे होते. या दागिण्यासह 400 ते 500 रुपयांची चिल्लर असलेला गल्ला व 1 हजार रुपयाची रोकड चोरट्यांनी लांबविली.
आईची आठवण म्हणून दागिणे मिळवून द्या
आईचा मृत्यू झाल्याने सर्व कुटुंबिय आधीच धक्क्यात होते. त्यात तिचे आठवण म्हणून असलेले दागिणेही चोरुन नेल्याने फिरोज व त्यांचे कुटुंबिय दुहेरी दुखाःत आहेत. आईला गमाविले, मात्र तिची आठवण असलेले दागिणे शोधून परत मिळावे, म्हणून फिरोज खाटीक यांनी शहर पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांना याचना केली आहे. त्यांनी तक्रार दिली असून गुन्हा दाखल झालेला नव्हता.