आईच्या मृत्यूनंतर तिच्या डोळ्यांनीही पाहिले जग

0

मनुरच्या शेतकर्‍याचा समाजापुढे आदर्श पायंडा ः स्मशानभूमीसाठी दिले बाकडे

बोदवड- अपघातात आईचा मृत्यू झाल्यानंतर तिचे डोळे दान करून मनुरच्या शेतकर्‍याने समाजापुढे आदर्श उभा केला आहे शिवाय तेराव्याच्या कार्यक्रमात जेवणावळीला फाटा देत स्मशानभूमीसाठी बाकडे देवून या शेतकर्‍याने समाजात अंतर्मुखही केले आहे. शेतकरी रामभाऊ पाटील यांच्या पत्नी तर दैनिक तरुण भारतचे पत्रकार नाना पाटील यांच्या मातोश्री सुलोचनाबाई पाटील यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. आईच्या मृत्यूनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाच अशा परीस्थिती बोदवडमधील सिध्दार्थ कोटेच्या यांनी पाटील कुटुंबियांशी संपर्क साधत आईच्या डोळ्यांचे दान केल्यास अंध बांधवास पुन्हा हे जग पाहण्याची संधी मिळणार असल्याचे सांगताच कुटुंबियांनी समाजापुढे आदर्श उभा करीत त्यास परवानगी दिली. मराठा समाजात तेराव्याच्या कार्यक्रमाला तितकेच महत्व असलेतरी सर्व धार्मिक विधी आटोपल्यानंतर जेवणावळीच्या कार्यक्रमाला फाटा देत गावातील स्मशानभूमीत नागरीकांना बसण्यासाठी 12 बाकडे या कुटुंबियाने देऊन समाजाला अंतर्मुखही केले आहे. समाजात परीवर्तन ही काळाची गरज असून परंपरेच्या तुलनेने विवेकास महत्व दिल्यास समाजात परीवर्तन निश्‍चित होईल, असा संदेश पाटील कुटुंबियांनी दिल्याने त्यांचे समाजमनातून कौतुक होत आहे. या कामासाठी त्यांना अनिल देवकर, ईश्वर सोनवणे, गजानन डोळस, शिवदास शेळके, मोहन देवकर, नकुल मिस्तरी, विलास पाटील, शरद पाटील यांनी सहकार्य केले.