शहरातील विकास कॉलनी व परीसरात 100 वृक्षरोपांची लागवड
भुसावळ- शहरातील तुषार हंबर्डीकर यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ विकास कॉलनी व लगतच्या विस्तारीत रहिवासी भागात मित्र परीवाराच्या सहकार्याने 100 वृक्षरोपांची लागवड केली. त्यांनी एक नवा आदर्श निर्माण केला असून दरवर्षी वृक्षरोपांची लागवड केली जाईल, असा संकल्पही केला आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून वृक्ष लागवड अभियान राबवण्यात येत आहे. त्यासाठी शासनाच्या आदेशानुसार शाळा, महाविद्यालये व शासकीय निमशासकीय संस्थांच्या माध्यमातून वृक्षरोपे लागवडीचे सोपस्कार पार पाडून फोटोसेशन व प्रसिद्धी केली जात आहे.
विविध भागात 100 झाडांची लागवड
राजकीय पक्षाच्या माध्यमातूनही आपल्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त वृक्षरोपांची लागवड करून मोठ्या प्रमाणात गाजावाजा केला जातो मात्र याला अपवाद ठरवित विकास कॉलनी येथील रहिवासी तुषार राजेंद्र हंबर्डीकर यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ विकास कॉलनी, विठ्ठल मंदिर परीसर, साकेत हौसींग सोसायटी, तुकाराम नगर, हनुमान मंदिर, नाहाटा महाविद्यालय परीसर अशा विविध भागात विविध प्रजातींच्या 100 वृक्षरोपांची लागवड करून समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण करण्यात आला. दरवर्षी वृक्षरोपांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचाही संकल्प करण्यात आला. त्यांच्या या उपक्रमास वनविभाग व मित्र परीवाराचे मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळाले.
जिवलग मित्रांची मिळाली साथ
आईच्या स्मरणार्थ वृक्षरोपांच्या उपक्रमात तुषार हंबर्डीकर यांना सुशात पराजंपे, योगेश वैदकर, सुनील जावळे, बापू महाजन, मोहन फालक, भूषण तळेले, युवराज वामने, सुमित चोरडीया, मंदीप सिंग, मयूर पाटील व वनविभागाचे पी.टी.वराडे, भ.न.पवार यांच्यासह परीसरातील नागरीकांचे सहकार्य मिळाले.