एरंडोल । आपल्या दिवंगत आईच्या स्मरणार्थ लाखो रुपये किमतीची दोन बिघे बागायती जमीन नवीन वृद्धाश्रमाच्या बांधकामासाठी देण्याचा आदर्श निर्णय राज्य परिवहन महामंडळाचे निवृत्त कर्मचारी मधुकर तिवारी यांनी घेतला. शहरातील कासोदा दरवाजा परिसरातील रहिवाशी तथा राज्य परिवहन महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचारी मधुकर केशव तिवारी यांनी आपल्या दिवंगत आईच्या स्मरणार्थ वृद्धाश्रमाचे बांधकाम करण्यासाठी अंजनी प्रकल्पा जवळील लाखो रुपये किमतीची दोन बिघे काळ्या मातीची सुपीक जमीन दान करण्याचा संकल्प जाहीर केला.
बांधकाम समिती अध्यक्षपदी तिवारी;सचिवपदी अॅड.शुक्ला
वृद्धाश्रमाच्या बांधकामासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत अध्यक्षपदी मधुकर तिवारी यांची तर सचिवपदी अॅड.मोहन शुक्ला यांची एकमताने निवड करण्यात आली. वृद्धाश्रमासाठी लागणार्या जागेचा प्रश्न सुटल्यामुळे वृद्धाश्रम बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. पाटील महाविद्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. संस्थेचे अध्यक्ष अमित पाटील अध्यक्षस्थानी होते. बैठकीस नगराध्यक्ष रमेश परदेशी, डॉ.एस.टी.पाटील, पंकज काबरा, चंद्रशेखर गंगेले, डॉ.सुरेश पाटील यांचेसह समिती सदस्य उपस्थित होते. वृद्धाश्रम निर्मितीत सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मधुकर तिवारी यांनी घेतलेल्या सामाजिक सेवेच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.