पुणे । आपल्या मनातील द्वेष, मत्सर काढून टाकण्याचे आणि माणसातला परमेश्वर शोधण्याचे बाळकडू एक आईच देते. आयुष्यातील सुखाचे क्षण आपल्या मुलाला मिळावेत, यासाठी ती आई अखंड धडपडत राहते. तिच्या या धडपडीप्रती कृतज्ञता ठेवत स्वच्छ मन आणि चांगल्या विचारांच्या बळावर यशशिखर गाठण्याचे ध्येय उराशी बाळगले पाहिजे, असे प्रतिपादन त्रिपुरा-बिहारचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी केले.श्री आदिशक्ती फाउंडेशनच्या वतीने दिल्या जाणार्या ’आऊसाहेब’ आणि ’शिवदास निनाद’ पुरस्कारांचे वितरण डॉ. डी. वाय. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी इतिहास अभ्यासक सदाशिव शिवदे, फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ता पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
शिवदास निनाद पुरस्कार
कावेरी काळे, शेवंतीबाई चव्हाण, लक्ष्मीबाई जोगदंड, शांताबाई राठी, कमलाबाई राठी, पौर्णिमा परमार यांना ’आऊसाहेब’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड, मुंबई यांना इतिहास अभ्यासक निनाद बेडेकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ’शिवदास निनाद पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
कर्तृत्वान मातांचा फाउंडेशनतर्फे सन्मान
विविध संकटांचा सामना करून अपत्यांना प्रगतीपथावर नेणार्या कर्तृत्वान मातांचा आदिशक्ती फाउंडेशनतर्फे सन्मान केला जातो. यंदा पुरस्काराचे सातवे वर्ष आहे. जिजाऊंसारख्या मातांना समाजासमोर आणून नवी पिढी घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे प्रास्ताविकात दत्ता पवार यांनी सांगितले. प्रा. अर्चिता मडके यांनी सूत्रसंचालन केले.
मनात चांगले विचार ठेवा
चांगला माणूस घडविण्याची किमया माता करीत असते. आपल्या प्रत्येकाच्या यशात त्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असतो. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या प्रेरणेनेच मला राज्यपाल पद भूषविता आले. मनात चांगले विचार ठेवून जीवनात चांगले क्षण मिळविण्याचा ध्यास अंगिकारण्याची शक्ती आपल्याला आईकडूनच मिळते, असे डॉ. डी. वाय. पाटील यांनी सांगितले.