शनिपेठ पोलीस ठाण्याकडून दुचाकी चोरीचा पर्दाफाश ; चोरीच्या 4 दुचाकी हस्तगत ;
जळगाव – पाच वर्षाचा असतांना आईने जगाचा निरोप घेतला. यानंतर वडीलांनी दुसरे लग्न केल्याने सोडून दिले. यानंतर आजीने पालनपोषण केले. आठवीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर आजीचेही निधन झाले. यानंतर बेवारस झाला. आता जगायचे कसे, दोन वेळचे जेवण मिळवायचे कसे या नादात त्याने गुन्हेगारीचा शॉर्टकट वापरला अन् सराईत चोरटा बनला. ही कहाणी आहे, शनिपेठ पोलिसांनी एम्पीफायर चोरीच्या गुन्ह्यात काही दिवसांपूर्वी अटक केलेल्या विकास उर्फ विक्की चंद्रकांत साळुखे वय 25 रा. कंडारी ता.भुसावळ याची. याच विक्कीने 4 दुचाकी चोरल्याचेही चौकशीत निष्पन्न झाले असून त्याच्याकडून तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. विक्कीकडून चोरीचा दुचाकी घेणार्या इसररा वलीअहद शेख वय 25 रा. चिनावल ता. रावेर याच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
व्यसने पूर्ण करण्यासाठी वळला गुन्हेगारीकडे
विक्की हा पाच वर्षाचा असतांना त्याची आईने जगाचा निरोप घेतला. यानंतर त्याचे वडीलांनी दुसरे लग्न केले व विक्कीला सोडून दिले. यानंतर विक्की भुसावळ शहरातील महादेव टेकडी या झोपडपट्टी परिसरात आजीकडे वाढला. आठवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाले. याचदरम्यान त्याच्या आजीचेही निधन झाले. यानंतर वाईट संगतीतून व्यसने जडली. जगायचे कसे व व्यसने पूर्ण करण्यासाठी विक्की गुन्हेगारीकडे वळला, अशी माहिती मिळाली आहे.
डी.जेतील एम्प्लीफायरच्या गुन्ह्यात घेतले ताब्यात
सदाशिव नगरातील मयुर रमेश सावदेकर यांच्या मालकीचे डी.जेचे वाहन रस्त्यावर उभे होते. 5 नोव्हेंबर रोजी रात्री या 407 वाहनातून तीन एम्लिफायर लांबविल्याची घटना घडली होती. शनिपेठ पोलीस ठाण्यात शनिपेठ पोलिसांनी संशयित विकास ऊर्फ विक्की चंद्रकांत साळुंके, रा. कंडारी यास मुद्देमालासह अटक केली आहे. तो आता न्यायालयीन कोठडीत कारागृहात आहे. आता दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात विक्की यास शनिपेठ पोलीस पुन्हा ताब्यात घेणार असून पुढील तपास करणार आहेत.
जळगावातून 3, अमळनेरातून एक दुचाकी चोरली
- भुसावळ सोडल्यानंतर आजीचे घर विक्कीने भाड्याने दिले. व तो जळगावातील धनाजी परिसरात आला. याठिकाणी तो वृध्द दाम्पत्याच्या घरी सहा हजार रुपये महिने भाडे करारावर वास्तव्यास होता. याच परिसरातील नागरिकांशी त्याने ओळखी केली. ओळखीतून मामा, मामी असे नातेही बनविले. सात महिन्यापासून तो याचठिकाणी राहतो. यादरम्यान विक्कीने राहत असलेल्या परिसरातून प्रत्येकी 25 हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी चोरल्या. यानंतर अमळनेर येथून 35 हजार रुपये किमतीची दुचाकी चोरी. याप्रकरणी अमळनेर तसेच शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. चौकशीत विक्कीने या 4 दुचाकी चोरीची कबूली दिली आहे. या दुचाकी त्याने मावसभाऊ विक्कीमुळे संपर्कात आलेल्या इसररा वलीअहद शेख रा. चिनावल ता.रावेर याला विकल्याची माहिती दिली.
- त्यानुसार पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोली अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपपोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक विठ्ठल ससे, गुन्हे शोध पथकातील दिनेशसिंग पाटील, परिस जाधव, संदीप पाटील, अमित बाविस्कर, अभिजित सैंदाणे, गणेश गव्हाळे, नितीन बाविस्कर, अमोल विसपुते, मुकूंद गंगावणे, राहुल घेटे, अनिल कांबळे, राहुल पाटील, किरण वानखेडे, अखलाख शेख, मनोज येवुलकर यांच्या पथकाने चिनावलहून इसररा याच्या सापळा रचून मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून गुन्ह्यातील चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. यातील एक दुचाकी कोणत्या ठिकाणाहून चोरली हे निष्पन्न झाले नसून तपासात ते समोर येणार आहे.
मावसभावामुळे पहिल्यांदाचा चोरली सुरतहून दुचाकी
रावेर तालुक्यातील चिनावल येथे विक्की याचा मावसभाऊ बंटी कोळी वास्तव्यास आहे. आजी वारल्यानंतर काही दिवस बंटीसोबत विक्की सुरत येथे वास्तव्यास होता. विक्कीने पहिल्यांदा बंटीसोबत सुरत येथून दुचाकी चोरली. ही दुचाकी बंटीच्या ओळखीतून चिनावल येथे इसररा वलीअहद शेख याला विक्री केली होती. याच माध्यमातून विक्कीची चोरीची दुचाकी घेणारा इसररा याच्याशी परिचय झाला होता.
सुरतहून चोरलेली दुचाकी केली होती परत
सुरतहून दुचाकी चोरीचा प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला होता. याप्रकारात बंटी कोळी व विक्की साळुंखे यांना गुजरात पोलिसांनी तसेच तेथील नागरिकांनी चांगलेच बदडले होते. यादरम्यान बंटीने दुचाकी परत करतो, गुन्हा दाखल करु नका अशी विनवणी केली होती. दहा हजारात रुपयात बंटीने ही दुचाकी इसररा यास विक्री केली होती. मात्र गुन्हा दाखल होवू नये म्हणून बंटीने इसररा यास 14 हजार रुपये देवून पुन्हा दुचाकी परत घेतली व दुचाकी सुरत जावून परत केली होती. त्यामुळे गुन्हा दाखल झाला नव्हता. दरम्यान विक्कीने सुरत येथून अनेक दुचाकी चोरल्याचा पोलिसांना संशय असून त्याचा तपास सुरु आहे.