चाळीसगाव। शहरातील शिवकॉलनीत 3 जुलै 2017 रोजी रात्री 20 वर्षीय तरुणीचा तिच्याच घरात निर्घृण खुन झाल्याची खळबळजनक घटना घडली होती. पोलीसांनी घटनास्थळाची पाहणी करुन मयत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपीविरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. यात संशयाची सुई घरातीलच व्यक्तीवर जात असल्याने पोलीसांनी अखेर तपास लावला असुन आईनेच खुन केला असल्याची माहिती पोलीसांनी सांगितले. यासंदर्भात आईला पोलिसांनी अटक केली असून तीला 15 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
विज्ञान शाखेच्या शेवटच्या वर्षाला होती तरूणी
शहरातील शिवकॉलनी परिसरात 3 जुलै 2017 रोजी रात्री 8.30 ते 11.30 वाजेच्या सुमारास मूळ देशमुखवाडी (ता. चाळीसगाव) येथील रहिवासी व चाळीसगाव आगारातील वाहक अनिल पाटील यांची मुलगी तृतीय वर्ष बी.एस्सी.तील विद्यार्थिनी सायली अनिल पाटील (20) हिचा राहते घरात खून झाला होता. त्यावेळी सायली तिच्या अभ्यासाच्या खोलीत होती तर आई व भाऊ दुसर्या खोलीत झोपले होते. सकाळी नळाला पाणी येणार म्हणुन सायलीची आई रत्ना अनिल पाटील (37) ही नळाला पाईप लावण्यासाठी उठली तेव्हा मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती व तिचा खुन झाल्याप्रकरणी मयत सायलीची आई रत्ना अनिल पाटील यांच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.
संशयाची बोटे घरच्या मंडळींवर
भरवस्तीत घर व घरात आई आणि भाऊ असतांना खुन कोणी केला असावा याबाबत पोलीस देखील अचंबित होती. घटना घडल्यावर घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बछाव, डिवायएसपी अरविंद पाटील, शहर पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांनी भेटी देवुन तपासाची चक्रे वेगवान फिरवली श्वान पथक मागवले त्याला देखील मार्ग काढता आला नाही. अंगुली मुद्रा पथकनेही त्यांचे काम केले धुळे येथील फॉरेन्सिक लॅब पथक देखील येवुन गेले. काही हाती लागत नसल्याने तेव्हा पोलीसांची संशयाची सुई घरच्यांवर गेल्याने पोलिसांनी यांनी जामनेर येथुन महिला पोउनि माधुरी बोरसे यांना पाचारण करुन सपोनि राजेंद्र रसेडे, पोउनि युवराज रबडे, प्रशांत दिवटे, हवालदार शशिकांत पाटील, बापूराव भोसले, पोना अरुण पाटील, योगेश मांडोळे, पोकॉ नितीन पाटील, बापूराव पाटील, राहुल पाटील, गोपाल भोई, गोपाल बेलदार, विकास पाटील यांच्या मदतीने कसुन तपास केला व जवळपास 10 ते 10 साक्षीदारांचे जबाब घेवुन व घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुरावे हाती लागल्याने धक्कादायक माहिती समोर येवुन जन्म देती व फिर्याद देणारी आईच खुनी निघाली असल्याची माहिती मंगळवार 11 जुलै 2017 रोजी पोलीसांनी दिली आहे.
अधिक तपास लागण्याची शक्यता
महिलेला दुपारी 12.30 वाजता अटक केली असुन तिला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने 15 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीत जर आरोपीने काही माहिती दिल्यास पुढील तपासाला गती मिळणार असुन सायलीचा खुन का करण्यात आला? या खुनात आणखी कोणी सहभागी आहे का? ती माहिती उघड होण्यास मदत होणार असल्याची माहिती तपासी अधिकारी रामेश्वर गाडे पाटील यांनी दिली आहे.