अपर्णा रामतीर्थकर यांचे मत
पिंपरी-चिंचवड : भारतीय संस्कृती ही भोगवादी नाही म्हणून प्रत्येक आईने आपल्या मुला-मुलींना स्पर्शाचे शिक्षण द्यावे; कारण जिथे स्पर्शाचे अंतर कमी होत जाते, तिथे अनैतिकतेला सुरवात होते. आईने आपल्या पाल्यांना नकार पचवायला शिकवले पाहिजे, अन्यथा पुढे ’इगो’ मुळे संसार उध्वस्त होतात, असे मत व्याख्याता अपर्णा रामतीर्थकर यांनी व्यक्त केले. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त स्वामी विवेकानंद मित्रमंडळ आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. ‘आई’ असा त्यांचा विषय होता. यावेळी पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर प्रमुख पाहुणे होते. तसेच उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेवक राजू मिसाळ, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मंगेश वर्टीकर, उद्योजक रंगनाथ गोडगे-पाटील, मुख्य संयोजक चंद्रकांत शिंदे प्रमुख उपस्थित होते.
संस्कृतीत आईला मोठे स्थान
रामतीर्थकर म्हणाल्या, ‘भारतीय संस्कृतीत आईला महत्त्वाचे स्थान आहे; परंतु पूर्वीच्या आईच्या जागी आता ’मम्मी’ आली आहे. टीव्ही मालिकांच्या आभासी जगात महिला हरवून गेल्या आहेत. रक्ताची तसेच जवळची नाती हळूहळू संपुष्टात येऊ लागली आहेत. दोन सख्ख्या भावांमध्ये आईला कोणी सांभाळायचे यावरून भांडणे होताहेत. या सर्व अनर्थाला ‘आई’ आणि ’शिक्षक’ हे दोन घटक जबाबदार आहेत. मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी आईची आणि नंतर शिक्षकाची असते. हल्लीच्या आईची आपल्या मुलीला मुलासारखेच वाढवेन अशी मानसिकता आहे. ती चुकीची तसेच निसर्गाविरूद्ध आहे. निसर्गाने स्त्रीला मातृत्वाचे वरदान दिले आहे, त्यामुळे मुलींना ’पुरुष’ बनवण्याच्या नादात त्यांचे वैवाहिक जीवन आपण बरबाद करीत आहोत, याचे भान मुलींच्या आईला राहिलेले नाही.
यांनी केले संयोजन
संयोजनात रामचंद्र वारंग, संतोष ढाणे, स्वप्निल कणसे, पंकज खोपडे, श्रीनिवास पाटील, सुनील जमखंडीकर, प्रशांत गोडगे-पाटील, आकाश झगडे, महेश महाजन, अशोक काचोळे, किशोर दरेकर, बबलू सुपेकर, अनिल शेलार यांनी सहकार्य केले. शीतल कापशीकर यांनी सूत्रसंचालन केले. अक्षय शेळके यांनी आभार मानले.