शिरपूर। सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम संस्था व महाविद्यालयामार्फत अतिशय चांगल्या प्रकारे सुरु आहे. जागतिक स्तरावरील विद्यार्थी तयार करण्याचे तळमळीने व आदर्श कार्य पाहून मनस्वी आनंद होतो. विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेऊन आपले उज्ज्वल भविष्य निर्माण करावे. आई वडील यांना आपल्या जीवनात सुखी ठेवावे. कोणीही चुकीच्या मार्गाने जावू नये. चुकीच्या सवयी आताच दूर कराव्या. जगात अशक्य असे काहीच नाही. परिश्रमाच्या जोरावर सर्वकाही शक्य करता येते. विद्यार्थ्यांनी देशातील नव्हे तर जगभरातील उत्कृष्ट इंजिनिअर बनून कॉलेजसह शिरपूरचे व देशाचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी केले.
अष्टपैलू विद्यार्थी तयार व्हावा
यावेळी प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील यांनी महाविद्यालयाच्या व संस्थेच्या यशस्वी वाटचालीबद्दल सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी नुसतेच अभ्यासू किडे न बनता महाविद्यालयातील विविध जादा कोर्सेसचा लाभ घेवून अनेक आव्हानांना तोंड देणारा अष्टपैलू विद्यार्थी तयार व्हावा. सॉफ्ट स्कील व अभ्यासू वृत्ती अंगीकारावी. देशाचे आधारस्तंभ बनून देशाची सेवा करावी.
विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम
ते आर.सी.पटेल इन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम 2017 कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, राजगोपाल भंडारी, प्रभाकरराव चव्हाण, बबनलाल अग्रवाल, कमलकिशोर भंडारी, योगेश भंडारी, राजेश वर्तक, सतिष मंडोरा, प्राचार्य डॉ.जे.बी.पाटील, उपप्राचार्य डॉ.प्रमोद देवरे, पंकज ठाकूर, प्रा.सुहास शुक्ल, प्रा.नितीन पाटील, प्रा.निलेश साळुंखे, प्रा. जी. व्ही.तपकिरे, प्रा.डी.आर.पाटील,प्रशांत महाजन आदी उपस्थित होते.
उपप्राचार्यांचा विशेष सत्कार
उपप्राचार्य डॉ. पी. जे. देवरे यांनी प्रास्ताविक केले. माजी विद्यार्थी पंकज ठाकूर याने आपले अनुभव कथन करुन उपस्थित सर्वांना महाविद्यालयाच्या अनेक उपक्रम व विविध सोयीसुविधा बद्दल माहिती दिली. सूत्रसंचालन विजय बाविस्कर व स्मितल पाटील यांनी तर आभार प्रा. सुहास शुक्ल यांनी मानले. पुणे सीड कंपनी व महाविद्यालय यांच्यात यावेळी सामंजस्य कराराची देवाणघेवाण करण्यात येवून कंपनीमार्फत प्राचार्य डॉ.जे.बी.पाटील, उपप्राचार्य डॉ.प्रमोद देवरे यांना उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला.