आई एकवीरादेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

0

धुळे- खान्देश कुलस्वामिनी आई एकविरादेवी मंदिरात 10 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या कालावधीत शारदीय नवरात्रोत्सच साजरा होणार आहे. बुधवारी सकाळी मंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव व सर्व ट्रस्टींच्या हस्ते देवीची आरती करून घटस्थापना करण्यात आली. दुपारी बारा वाजेला महापूजा व महाआरती महापौर कल्पना महाले यांच्याहस्ते करण्यात आली. नवरात्र उत्सवाच्या काळात दररोज सकाळी पाच वाजेला महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.

महाआरतीचे यजमानपद भाविकांना दिले जाणार आहे. ललिता पंचमीला 13 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता 101 कुमारी पूजन, बुधवारी 17 ऑक्टोबरला नवचंडी यज्ञ, 18 ऑक्टोबरला सुवासिनी पूजन, 24 ऑक्टोबरला भगवती पालखी सोहळा, 56 भोग नैवेद्य, भक्ती व सुगम संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली जाणार आहे. भाविकांनी नवरात्रोत्सवात आयोजित विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य ट्रस्टी सोमनाथ गुरव यांनी केले आहे.