‘आई डे केअर’च्या गतिमंद मुलांनी बनविल्या आठ हजार राख्या

0

पेण (राजेश प्रधान) : गतिमंद मुले ही काही पालकांना ओझे वाटतात पण याच मुलांना योग्य प्रशिक्षण दिले तर ती कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करतात. आणि हे शक्य करुन दाखवले आहे ते पेणमधील आई डे केअर मधील गतिमंद मुलांनी. मागील वर्षी गणेशाचे वाहन उंदीर बनविन्याचा रिकॉर्ड करणाऱ्या या मुलांनी या वर्षी राखीच्या पवित्र बंधनांच्या निर्मितीत स्वत:ला गुंतवून घेतले असून, आठ हजार राख्या बनविन्याचा संकल्प त्यांनी केला आहे. त्या सर्व राख्या तयार होऊन विक्रीही झाल्या आहेत अशी माहिती ‘आई डे केअर’ शाळेच्या प्रमुख स्वाती मोहिते यांनी दिली. गेल्या सहा वर्षांपासून ही विशेष मुले राख्यांची निर्मिती करतात. यात गोंड्याच्या, मन्यांच्या तसेच इकोफ्रेंडली राख्यांचाही यात समावेश आहे.

आई डे केअर’मध्ये ३ ते ४७ वयोगटातील ५० मुले आहेत. यातील प्रौढ म्हणजेच १८ वयोमानाच्या पुढील २६ मुले आहेत. ही मुले राखि नबनविन्यापासून पैकिंगचे काम ही करतात.

यंदा पेण प्रायव्हेट हायस्कूल, पेण प्रायव्हेट कनिष्ठ महाविद्यालय, गुरुकुल शाळा आदी पेण परिसरातील सर्व शाळांनी या विशेष मुलांकडे राख्यांची आगाऊ मागणी नोंदविल्याने, यंदा या विशेष मुलांच्या उत्साहाला पारावारच उरलेला नाही. तसेच पेण एल.आय.सी.आॅफिस, पोस्ट आॅफिस, एम.टी.एन.एल.ऑफिस, रोटरी क्लब आॅफ पेण, रोटरी क्लब आॅफ पेण ओरायन, रोटरॅक्ट क्लब, रोटरी क्लब आॅफ पेण हिरकणी, इनरव्हील क्लब आॅफ पेण, अहिल्या महिला मंडळ, जिंदाल स्टील वर्क्स, हायकल लि. पनवेल, उत्तम गॅल्व्हा, आरसीएफ आणि नवजीवन ग्लोबल हेल्थ सेंटर, ठाणे व बोरीवली या संस्थाही राखीच्या ग्राहक आहेत. आम्ही ज्यांची निर्मिती करतो त्याच्या खरेदीसाठी मागणी येते, या गोष्टीमुळे या मुलांमधील आत्मविश्‍वास प्रचंड वृद्धिंगत झाला आहे. त्यामुळेच त्यांनी राखी निर्मितीच्या कामात स्वत:ला झोकून दिले होते.आय डि बि आय बँकेनेही 10000 राख्यांची आॅर्डर दिली आहे. या करीता ईनरव्हील क्लब पेण च्या महिलांचे सहकार्य लाभल्याचे मोहिते यांनी सांगितले.

शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या या राख्यांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे. विविध शाळा, कॉलेज, कार्यालये, सामाजिक सांस्कृतिक संस्था, गृहनिर्माण संस्थामध्ये या राख्यांना मोठय़ा प्रमाणात मागणी असून, विशेष हातांनी तयार केलेल्या या कलेचे कौतुक होत आहे.

या मुलांनी एकदा काम हाती घेतले की त्यामध्ये ती एवढी मग्न होतात की त्यांना आजूबाजूच्या जगाचा विसरच पडतो. धागा ओवताना हातात सुई धरण्यापासून ते मणी ओवेपर्यंत संपूर्ण काम शिकविण्यासाठी शाळेच्या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभते. आता राख्यांच्या निर्मितीस व्यावसायिक स्वरुप प्राप्त झाल्याने समाजाच्या मूळ प्रवाहापासून थोडीशी बाजूला असणार्‍या या विशेष मुलांनी ‘हम भी कुछ कम नही’असा सुप्त संदेशच समाजास दिला आहे. अर्थात या कामी आई डे केअर शाळेच्या प्रमुख स्वाती मोहिते आणि त्यांचा सहकारी शिक्षकवृंद यांचे परिश्रम मोठे आहेत.

यामुलांचा नुसता सांभाळ करणच नाही तर व्यवसाय प्रशिक्षण देऊन व्यवसायभीमुख बनविन्याचा आमचा उद्देश आहे. त्यांना या कामाचे ५०० रुपया पासून २००० हजार रुपयांपर्यंत मानधन संस्थेमार्फत दिले जाते अणि ते त्यांच्या बँक ऑफ इंडिया बँकेच्या बचत खात्यात जमा केले जाते. यामुळे ही मुले भविष्यात आपल्या पायावर उभी राहून स्वतःचा व्यवसाय सुरु करु शकतील अशी प्रतिक्रीया स्वाती मोहिते अध्यक्षा, आई डे केअर, पेण यांनी दिली.