आई मला शाळेला जायचंय ऽऽऽ, जाऊ दे नं वं !

0

ऑनलाईन शिक्षणाचा कंटाळा आलेल्या विद्यार्थ्यांची पालकांकडे विनवणी

नितीन पाटील: आई मला खेळायला जायचं या ऐवजी आता आई मला शाळेला जायचं’ अशी विनवणी ऑनलाईन शिक्षणाला कंटाळलेल्या विद्यार्थ्यांकडून पालकांना होऊ लागली आहे. जवळपास दहा ते अकरा महिन्यापासून कोरोनाच्या महामारी मुळे शाळा बंद असून अजूनही इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे विद्यार्थी शाळा उघडण्याच्या प्रतीक्षेत आहेत. बच्चे कंपनी एवढी मोठी सुट्टी उपभोगून आता कंटाळले आहेत. त्यांना शाळेची ओढ लागली आहे. काही विद्यार्थी अगतिक होऊन शाळेत सुद्धा जातात. परंतु शाळा बंद असल्यामुळे ते निराश होऊन घरी परततात. अन पालकांना ते तक्रार करतात ‘पप्पा कंटाळा आला हो ऑनलाइन शिक्षणाचा आता आम्हाला हवे वर्गातील बाकावर बसून खडू-फळ्याचे शिक्षण’. आपल्या पाल्याची कथा व व्यथा ऐकून बरेच पालक गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील यांना भेटले व इयत्ता पहिली ते चौथी चे वर्ग त्वरित सुरू करा अशी पालकांनी मागणी केली. परंतु शासनाचे अजूनही त्याबाबत आदेश नसल्यामुळे गटशिक्षणाधिकारी याबाबत काही एक निर्णय घेऊ शकत नाही.

एरंडोल तालुक्यात आठवडाभरापासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले आहेत. याआधीच नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले होते.शाळेची घंटा खणखनल्या मुळे शाळांमध्ये काही प्रमाणात का होईना किलबिल सुरू झालेली आढळून आली. ऑनलाइन शिक्षणामुळे जाम वैतागलेले विद्यार्थी शाळांमध्ये येऊ लागल्यामुळे एक नवा जोम नवा उत्साह नवी उमेद त्यांच्या चेहर्‍यावर दिसून येत आहे. आता हजेरीपट सुद्धा वाढत आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.

शाळा उघडण्याची उत्सुकतेने बघताय वाट
एरंडोल तालुक्यात इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग असलेल्या एकूण शाळा 108 असून त्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 84, इंग्लिश मिडीयम शाळा 19, खाजगी प्राथमिक शाळा 5, याप्रमाणे शाळांचा समावेश आहे. सुमारे 15 हजार विद्यार्थी अजूनही शाळा उघडण्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. एरव्ही सुट्टी मिळाल्याच्या आनंदात ऐवजी सलग दहा अकरा महिन्याची प्रदीर्घ सुट्टी मिळाल्यामुळे चिमुरडे घरी जाम वैतागले आहेत आपली शाळा कधी सुरू होणार याबाबत त्यांना उत्कंठा लागली आहे. कोरोनाचा सर्व क्षेत्रांना फटका बसला असून शिक्षण क्षेत्रात सुद्धा कोरोनाची झळ जाणवत आहे. विद्यार्थ्यांची जीवन शैली बदलून गेलेली आहे. विद्यार्थी व शाळा यांच्यातील अतूट नाते गेल्या दहा ते अकरा महिन्यापासून दुरावले आहे. दरम्यान ऑनलाइन शिक्षण हा तात्पुरती मलमपट्टी करणारा उपाय मानला जातो. खरे शिक्षण शाळेत वर्गात मिळते अशी भावना विद्यार्थ्यांची झाली आहे.